Sensex-Nifty at Record High: जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये असून पीएसयू बँकेच्या निफ्टी निर्देशांकानं दीड टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल चांगला आहे. एकंदरीत आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ३.५६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ३५५.३० अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी वधारून ८१,६८८.०२ वर आणि निफ्टी ५० हा १२०.१० अंकांनी म्हणजे ०.४८ टक्क्यांनी वधारून २४,९५४.९५ वर बंद झाला. यापूर्वी सेन्सेक्स ८१,३३२.७२ वर आणि निफ्टी २४,८३४.८५ वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५६ लाख कोटींची वाढ
एक दिवसापूर्वी म्हणजे २६ जुलै २०२४ रोजी बीएसईवरील सर्व लिस्टेड शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५६,९२,६७१.३३ कोटी रुपये होतं. आज २९ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६०,४९,२२९.०४ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ३,५६,५५७.७१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
२१ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २१ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे टायटन, पॉवरग्रिड आणि एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.