मुंबई : निराशाजनक स्थूल आर्थिक डाटा आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आलेला प्रतिकूल शेरा, यामुळे गुरुवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी अंकांनी घसरून पाच महिन्यांच्या नीचांकावर गेले. भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत व उलाढालींमध्ये मागील १७ वर्षांतील सर्वांत वाईट जुलै हा २०१९ मधील होता, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
३० कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स दुपारच्या सत्रात ७५० पेक्षा जास्त अंकांनी आपटला होता. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली. तरीही सत्राच्या अखेरीस तो ४६२.८० अंकांनी अथवा १.२३ टक्क्याने घसरून ३७,०१८.३२ वर बंद झाला. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी १३८ अंकांनी अथवा १.२४ टक्क्यांनी घसरून ११ हजार अंकांच्या खाली १०,९८०.०० अंकांवर बंद झाला. ही निर्देशांकांची मार्चच्या सुरुवातीनंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. कमजोर आर्थिक आकडेवारी, विदेशी निधीचा निरंतर बहिर्प्रवाह व निराशाजनक तिमाही निकाल याचा बाजाराच्या धारणेवर परिणाम दिसून आला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने देशाच्या धोरणात्मक व्याजदरात बुधवारी तब्बल एक दशकानंतर कपात केली. २५ आधार अंकांच्या कपातीनंतर ‘फेड’चा व्याजदर २.० ते २.२५ टक्के झाला. व्याजदरात कपात झाली असली तरी फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, ‘ही काही दरकपात शृंखलेची सुरुवात नाही.’ पॉवेल यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक बाजारांना धक्के बसले.बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर आर्थिक आकडेवारी जाहीर झाली होती. ही आकडेवारी निराशाजनक असल्यामुळे गुरुवारी शेअर बाजार आपटले.वित्तीय तूटही भोवलीयाशिवाय भारत सरकारची वित्तीय तूट जूनमध्ये वाढून ४.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ती ६१.४ टक्के आहे.