मुंबई : वोडाफोन-आयडिया व भारती एअरटेल पाठोपाठ रिलायन्स-जिओनेही दरवाढ करण्याची घोषणा केल्याने आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४ टक्क्याने वधारून १५७१ रुपयांवर पोहचला. त्यामुळे रिलायन्सचे बाजारमूल्य ९.९० लाख कोटी झाले. दुपारच्या सत्रात दलालांनी रिलायन्स विकायला सुरुवात केल्याने हा शेअर शेवटी १५४७ वर बंद झाला.
रिलायन्स-जिओची फोर-जी सेवा जून २०१६ मध्ये सुरू झाल्यानंतर रिलायन्सने आपले दर स्पर्धकांपेक्षा जवळपास २० टक्के स्वस्त ठेवले होते. त्यामुळे या दूरसंचार कंपन्यांमधे दरयुद्ध सुरू झाले. आता ते इतिहासजमा होणार आहे आणि ग्राहकांसाठी मोबाइल फोन महाग होणार आहे.तिन्ही कंपन्यांनी दर किती वाढवणार हे जाहीर केले नसले तरी मोबाइल सेवा १० ते २० टक्के महाग होईल. असा अंदाज टेलीकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक १८२ अंकांनी वधारून ४०,६५२ वर बंद झाला. तर निफ्टी ६० अंकांनी वाढून ११,९९९ वर बंद झाला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने ४०,८१६ अंकांचा पल्ला गाठला, तर निफ्टीने १२,०३९ अंकांचे शिखर सर केले. ही सर्वोच्च पातळी आहे.
परिणामी, रिलायन्स ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरली. तेजीमुळे सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे शेअर वधारून बंद झाले. त्यामध्ये रिलायन्ससह मारुती-सुझुकी, बजाज फायनान्स, हिरो मोटोकेल, एशियन पेन्टस, इंडसइंड बँक, एलअँडटी, एचडीएफसी बँक, टेक महिन्द्र, सनफॉर्मा, आयबीसी, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.
सेन्सेक्स, निफ्टीने गाठले सर्वोच्च शिखर
वोडाफोन-आयडिया व भारती एअरटेल पाठोपाठ रिलायन्स-जिओनेही दरवाढ करण्याची घोषणा केल्याने आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४ टक्क्याने वधारून १५७१ रुपयांवर पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 01:34 AM2019-11-21T01:34:45+5:302019-11-21T01:35:31+5:30