-प्रसाद गो. जोशी
शेअर बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकांनी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर बाजारात काहीशी मरगळ आली. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले. लक्ष्मीपूजनाला नवीन वर्षाच्या मुहूर्ताच्या सौद्यांना प्रारंभी वाढ दर्शविणा-या निर्देशांकाने नंतर गटांगळी खाल्ली. सलग दुस-या वर्षी मुहूर्ताच्या सौद्यांनाच बाजाराचे निर्देशांक खाली आले.
गतसप्ताहात पहिल्याच दिवशी घाऊक किमतीवर आधारित कमी झालेली चलनवाढ आणि काही आस्थापनांचे आशादायक तिमाही निकाल, यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानी नवीन विक्रमी उंची गाठली.
संवेदनशील निर्देशांकाने ३२६३३.६४ असा नवा विक्रम नोंदविला, तर निफ्टी १०२३०.८५ अशा आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवर बंद झाला. यानंतर मात्र, बाजारावर विक्रीचे दडपण वाढलेले दिसून आले. परिणामी, सप्ताहाच्या अखेरीस हे दोन्ही निर्देशांक मागील बंद निर्देशांकापेक्षा खाली येऊन अनुक्रमे ३२३८९.९६ आणि १०१४६.५५ अंशांवर बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमधील वाढ मात्र कायम राहिली आहे.
गुरुवारी बाजारात विक्रम संवत २०७४ च्या मुहूर्ताचे सौदे झाले. या मुहूर्ताला निर्देशांक वाढीव पातळीवर खुले झाले. मात्र, नंतर त्यांना फारसा पाठिंबा मिळत नसल्याने, अखेरीस संवेदनशील निर्देशांक, तसेच निफ्टी खाली आले. सलग दुसºया वर्षी बाजारामध्ये मुहूर्ताच्या
सौद्यांना झालेल्या व्यवहारांमध्ये घसरण झालेली बघावयास
मिळाली.
असे असले, तरी विक्रम संवत २०७३ गुंतवणुकदारांसाठी चांगले राहिले आहे. या वर्षभरामध्ये बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये ४६४२.८४ अंश म्हणजेच १६.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी या अधिक व्यापक पायावरील निर्देशांकामध्ये १५७२.५८ अंश म्हणजेच १८.२ टक्के अशी घसघशीत वाढ पाहावयास मिळाली.
>रेल्वेच्या ३ आस्थापना पुढील तिमाहीत बाजारात
रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील नफा कमविणा-या तीन आस्थापना लवकरच प्रारंभिक भागविक्रीसाठी बाजारात येणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस बॅँका आणि वित्तीय संस्थांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन, जानेवारीच्या प्रारंभी याबाबतची सूचना प्रकाशित केली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पाेरेशन (आयआरएफसी) (१९२९ कोटी), इरकॉन इंटरनॅशनल (५६४ कोटी) आणि राइटस् (३२५ कोटी) या तीन आस्थापनांची भागविक्री केली जाणार आहे. यामधून केंद्र सरकारला सुमारे २८०० कोटी रुपये मिळू शकतील.
या इश्यूसाठी लीड मॅनेजर्सचीही नियुक्ती झाली असून, त्याबाबतचे प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहेत. याशिवाय रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांची शेअर बाजारात नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
शेअर बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रम; मात्र मुहूर्तालाच खाल्ली गटांगळी
शेअर बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकांनी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर बाजारात काहीशी मरगळ आली. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:33 PM2017-10-22T23:33:58+5:302017-10-22T23:34:12+5:30