- प्रसाद गो. जोशीसेन्सेक्स आणि निफ्टी या दोन प्रमुख निर्देशांकांनी गाठलेली नवीन उच्चांकी पातळी, जगभरातील शेअर बाजारांमधील चांगले वातावरण, परकीय वित्तसंस्थांची कायम असलेली खरेदी या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या पूर्वार्धात तेजी बघावयास मिळाली. मूडीज या पतमापन संस्थेने भारताचा दर्जा कमी केल्याने सप्ताहाच्या अखेरीस बाजारावर विक्रीचे दडपण येऊन निर्देशांक खाली आले. मात्र सप्ताहाचा विचार करता ते वाढले.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचाही प्रारंभ तेजीनेच झाला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ४०,७४९.३३ अंश असा नवीन उच्चांकी गेला. त्यानंतर तोे ४०,०३७.५३ अंशांपर्यंत खालीही आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ४०,३२३.६१ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत तो १५८.५८ अंशांनी (म्हणजेच ०.३९ टक्के) किरकोळ वाढला.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही संमिश्र अनुभव आला. येथील निर्देशांकाला (निफ्टी) प्रथमच १२ हजार अंशांची पातळी गाठता आली. मात्र त्यानंतर तो खाली येऊन सप्ताहाच्या अखेरीस ११,९०८.१५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये १७.५५ अंश (म्हणजे ०.१४ टक्के) अशी किरकोळ वाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झालेली दिसून आली. मिडकॅप १५९.४७ अंशांनी (१.०७ टक्के) खाली येऊन १४,७३१.११ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकामध्येही ०.९३ टक्के म्हणजे १२६.१७ अंशाची घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १३,४७४.७५ अंशांवर बंद झाला.आगामी काळात काही महत्त्वाच्या करविषयक सुधारणा करण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान बाजाराला बळ देऊन गेले. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ३२०४.९३ कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र देशांतर्गत वित्तसंस्थांनी ४४३१.२७ कोटींची विक्री केली. मूडीजने भारताची आर्थिक वाढ समाधानकारक नसल्याने पतदर्जा कमी केला. त्यामुळे बाजारावर विक्रीचे दडपण येऊन अखेरच्या दिवशी तो खाली आला.>युनियन लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडआपल्या गुंतवणूकदारांना भांडवल वृद्धी मिळवून देण्यासाठी त्यांची रक्कम लार्ज आणि मिडकॅप आस्थापनांच्या समभागांमध्ये गुंतविण्याच्या उद्देशाने युनियन म्युच्युअल फंड येत्या १५ तारखेपासून वरील योजना आणत आहे. या योजनेमध्ये ग्रोथ आणि डिव्हिडंड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. ओपन एण्डेड असलेल्या या योजनेमधील गुंतवणुकीची जोखीम बरीच मोठी आहे. एक वर्षाच्या आतमध्ये योजनेतून बाहेर पडल्यास एक टक्का एक्झिट लोड आकारला जाईल. योजनेसाठी बीएसई २५० हा बेंचमार्क निर्देशांक ठरविण्यात आला आहे.>परस्पर निधींच्या मालमत्तेमध्ये ७.४ टक्के वाढसमभागांशी संबंधित तसेच लिक्विड योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे आॅक्टोबरअखेर देशातील परस्पर निधींच्या देखरेखीखालील एकूण मालमत्ता २६.३३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षा त्यामध्ये ७.४ टक्कयांनी वाढ झाली आहे.असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी)ने ही माहिती जाहीर केली आहे. या संघटनेचे ४४ सभासद असून आॅक्टोबरअखेरीस त्यांच्या व्यवस्थापनाखाली २६.३३ ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. सप्टेंबर अखेरीस ती २४.५ ट्रिलियन रुपये होती.परस्पर निधींच्या योजनांमध्ये आॅक्टोबर महिन्यात १.८३ ट्रिलियन रुपये भरले गेले. त्यापैकी तब्बल ९३,२०० कोटी रुपये हे लिक्विड फंडांमध्ये गुंतविले गेले आहेत. याआधी सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी परस्पर निधींमधून १.५२ ट्रिलियन रुपये काढून घेतले होते.
सेन्सेक्स, निफ्टीची नवीन उंची; अखेरीस मात्र निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:38 AM