मुंबई : सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदविल्यानंतर मुंबई बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र दोन्ही निर्देशांक घसरले आहेत. या आठवड्यात सेन्सेक्स १९८.२२ अंकांनी तर निफ्टी ८६.८५ अंकांनी म्हणजेच 0.९७ टक्क्याने घसरला.चढ-उतारांनी भरलेल्या आजच्या सत्रात सेन्सेक्स १८६.१४ अंकांनी अथवा 0.६६ टक्क्याने वाढून २८,५९९.0३ अंकांवर बंद झाला. ९ सप्टेंबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. ९ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स २८,७९७.२५ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ३७.३0 अंकांनी अथवा 0.४३ टक्क्याने वाढून ८,७७९.८५ अंकांवर बंद झाला. पेट्रोलचे दर वाढविण्यात आल्यामुळे इंडियन आॅईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांचे समभाग २.0१ टक्के ते 0.७३ टक्का यादरम्यान वाढले. स्मॉलकॅप 0.१५ टक्क्याने, तर मिडकॅप 0.३२ टक्क्याने वाढला. आशियाई बाजारांपैकी जपानचा निक्केई 0.७0 टक्क्याने वाढला. हाँगकाँग, चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया येथील बाजार सार्वजनिक सुटीमुळे बंद होते. युरोपीय बाजारांत सकाळी नरमाईचा कल होता. फ्रान्स, जर्मनी आणि लंडन येथील बाजार अनुक्रमे 0.३0 टक्का, 0.३४ टक्का आणि 0.0३ टक्का घसरण दर्शवीत होते.
सेन्सेक्स एक आठवड्याच्या उच्चांकावर
By admin | Published: September 17, 2016 5:38 AM