मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या शेअर बाजारामध्ये आज सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक असलेल्या सेंसेक्समध्ये 1001.31 अंकांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सेंसेक्स 34 हजारांच्या खाली जाऊन 33 हजार 759.58 अंकांवर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली असून, निफ्टीही 311 अंकांनी घसरला आहे. या पडझडीमुळे पाच मिनिटांमध्ये सुमारे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यावर भागधारकांनी विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सेंसेक्समधील 31 पैकी 30 शेअर्सचे भाव कोसळले. तर निफ्टीमधील 50 पैकी 46 शेअर्सचे भाव कोसळले. सुरुवातीलाच 697 अंकांच्या घसरणीसह उघडलेला सेंसेक्स काही वेळातच 1000 अंकांनी कोसळला. एस-400 करारामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने भारतावर निर्बंध घालण्याचे दिलेले संकेत आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा प्रतिकूल परिणाम सेंसेक्सवर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शेअर बाजारातील या घसरणीमुळे काही मिनिटांमध्येच 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.