मुंबई: आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस शेअर बाजारासाठी वाईट ठरताना दिसत आहे. तीन दिवसांत दिसलेली तेजी एका दिवसात संपुष्टात आली आहे. एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आज पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स ५०० अंकांहून अधिक खाली घसरला. थोड्याच वेळात पडझड १००० अंकांवर जाऊन पोहोचली. निफ्टीची अवस्थाही वाईट आहे. बाजारात नुकत्याच लिस्ट झालेल्या झोमॅटोचे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले आहेत.
मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात आज मोठी पडझड होत असल्याचं दिसून येत आहे. प्री-ओपन सेशनमध्ये बीएसईचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स ४८० अंकांनी घसरला. बाजारात उलाढाल सुरू होताच घसरण थेट ६३६ अंकांपर्यंत पोहोचली. निफ्टीमध्ये जवळपास २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी १७ हजार ४०० अंकांपर्यंत आला.
बाजारातील कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्येच सेन्सेक्स ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. काही वेळात बाजार पूर्वपदावर येऊ लागला. मात्र नुकसान कायम होतं. सकाळी साडे नऊ वाजता सेन्सेक्स ६९० अंकांपर्यंत घसरला. निफ्टीचीदेखील घसरण झाली होती. सव्वा दहाच्या सुमारास सेन्सेक्सची घसरण ९८४ अंकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे सेन्सेक्स ५८ हजारांच्या खाली गेला. त्याचवेळी निफ्टी दीड टक्क्यांनी घसरून १७ हजार ३५० अंकांच्या खाली गेला.