मुंबई : कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि बाजारात असलेली घबराट यामुळे शेअर बाजारामध्येही गडगडाट झाला. सर्व प्रमुख निर्देशांकांमध्ये घट झाली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये एक हजार अंशांहून अधिक घट झालेली दिसून आली.मंगळवारी मुंबई शेअर बाजारात व्यवहारांचा प्रारंभच घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे एक हजार अंश खाली जाऊन खुला झाला. त्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याने हा निर्देशांक ३०,३७८ अंशांपर्यंत खाली गेला. यानंतर काहीसा सावरत बाजार बंद होताना तो ३०,६३६.७१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १०११.२९ अंश म्हणजेच ३.२० टक्के घट झाली. बॅँका, माहिती तंत्रज्ञान आणि आॅटो क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. दिवसभरामध्ये इंडस इंड बॅँक, बजाज फायनान्स, अॅॅक्सिस बॅँक, आयसीआयसीआय बॅँक, महिंद्र अॅण्ड महिंद्र, टाटा स्टील, ओएनजीसी, मारुती या समभागांमध्ये घट झाली. दुसऱ्या बाजूला भारती एअरटेल, हिरो मोटोक्रॉप, नेस्ले यांचे समभाग वाढले. आशिया तसेच युरोपमधील शेअर बाजार मंगळवारी खाली घसरले आहेत. कच्च्या तेलाच्या दरातील अभूतपूर्व घसरणीचा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीसुद्धा असाच घसरून कमी झाला. त्यामध्ये दिवसभरामध्ये २८०.४० अंश म्हणजेच ३.०३ टक्के घट झाली. हा निर्देशांक ८९८९.४५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सुमारे ३ टक्के घट झाली आहे.
बाजारात गडगडाट; निर्देशांक घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:04 AM