Join us  

शेअर बाजारात ३६४ अंकांची उसळी

By admin | Published: August 06, 2016 4:14 AM

राज्यसभेत मंजूर झालेले जीएसटी विधेयक यामुळे शेअर बाजारात तेजीचा संचार झाला आहे

मुंबई : बँक आॅफ इंग्लंडने धोरणात्मक व्याजदरांत केलेली कपात आणि राज्यसभेत मंजूर झालेले जीएसटी विधेयक यामुळे शेअर बाजारात तेजीचा संचार झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३६४ अंकांनी वाढून २८ हजार अंकांच्या पुढे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६00 अंकांच्या पुढे गेला आहे. बँक आॅफ इंग्लंडने धोरणात्मक व्याजदरांत 0.२५ आधार अंकांची कपात केली आहे. त्यानंतर हा दर 0.२५ टक्के झाला आहे. बँक आॅफ इंग्लंडने २00९नंतर प्रथमच व्याजदर कमी केले आहेत. या निर्णयामुळे बाजारात भांडवलाचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे जगभरातील बाजारांवर परिणाम झाला आहे. राज्यसभेने जीएसटी विधेयक मंजूर केल्यानंतर भारतातील ऐतिहासिक कर सुधारणांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचाही बाजारांवर व्यापक परिणाम झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ३६३.९८ अंकांनी अथवा १.३१ टक्क्यांनी वाढून २८,0७८.३५ अंकांवर बंद झाला. ११ जुलैनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवशीय वाढ ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ४९९.७९ अंकांनी वाढला होता. काल सेन्सेक्स १६.८६ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा एनएसई निफ्टी १३२.0५ अंकांनी अथवा १.५४ टक्क्यांनी वाढून ८,६८३.१५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग वाढले. हीरो मोटोकॉर्पचा समभाग सर्वाधिक ५.0२ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल बजाज आॅटो, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, एमअ‍ॅण्डएम, एलअ‍ॅण्डटी आणि अदाणी पोर्ट्स यांचे समभाग वाढले. आशियाई बाजारांत तेजीचा कल दिसून आला. हाँगकाँगचा हँग सेंग १.४४ अंकांनी वाढला. जपानचा निक्केई स्थिर राहिला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचा कल होता. लंडनचा एफटीएसई 0.४0 टक्क्यांनी, फ्रँकफूर्टचा डॅक्स 0.२0 टक्क्यांनी, तर पॅरिसचा कॅक 0.४ टक्क्यांनी तेजीत होता. (प्रतिनिधी)