शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीयुरोपातील व्याजदर कायम राहण्याची घोषणा, तीन दिवसांच्या जीएसटी परिषदेमुळे जीएसटी लागू होण्याकडे पडलेले आणखी एक पाऊल अशा सकारात्मक वातावरणामुळे मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने २८ हजारांचा टप्पा ओलांडून गुंतवणूकदारांना मानसिक समाधान दिले. रिलायन्सचा कमी झालेला नफा आणि परकीय वित्तसंस्थांची विक्री, यामुळे बाजाराला फटका बसला. मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांकामध्ये बरीच हालचाल झालेली दिसून आली. सप्ताहामध्ये हा निर्देशांक २८,२१२ ते २७,४८८ अंशांमध्ये फिरताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस तो २८०७७.१८ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ४०३.५८ अंश म्हणजेच १.४६ टक्क््यांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.२८ टक्के म्हणजेच, १.६५ टक्क््यांनी वाढून ८६९३.०५ अंशांवर बंद झाला. संवेदनशील निर्देशांक २८ हजारांपुढे गेल्याने, गुंतवणूकदारांच्या मनातील धाकधूक काही प्रमाणात कमी झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही निर्देशांकांमध्येही सप्ताहामध्ये वाढ झालेली दिसून आली.युरोपीयन सेंट्रल बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पूर्वीचेच दर कायम राखण्याचा निर्णय झाला. युरोपीयन अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी, गरजेनुसार प्रोत्साहन योजना लागू करण्याची घोषणाही युरोपीयन बँकेने केली आहे. यामुळे युरोपीयन बाजारामध्ये वाढ झाली असली, तरी आशियामधील शेअर बाजार खाली आले. अमेरिकेतील डॉलर इंडेक्समध्ये वाढ झाल्यामुळे, या वर्षाच्या अखेरपर्यंत तेथील व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा परिणाम, अमेरिकेसह जगभरातील बाजार खाली येण्यात झालेला दिसून आला. भारतामधील आयातदारांकडूनही अमेरिकन डॉलरला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये घट झाली आहे.रिलायन्स इंडस्ट्रिज या भारतातील सर्वात मोठ्या आस्थापनेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. या आस्थापनेच्या नफ्यामध्ये २३ टक्क््यांनी घट झाली असल्यामुळे, काही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मार्ग अवलंबला. यामुळे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजार काहीसा खाली आला. मात्र, आधीच्या मोठ्या वाढीमुळे सप्ताहाची अखेर हिरव्या रंगामध्ये झाली.परकीय वित्तसंस्थांनी चालू महिन्यामध्ये भारतीय बाजारामधून ७५०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या दरकपातीचा हा परिणाम असू शकतो. दरकपातीमुळे बाँडवरील परतावा कमी होईल.
सेन्सेक्सने पुन्हा गाठला २८ हजारांचा टप्पा
By admin | Published: October 24, 2016 3:50 AM