मुंबई : गुंतवणूकदारांचा मोठा पाठिंबा आणि जगभरातील शेअर बाजारांमधील अनुकूल वातावरणामुळे शुक्रवारी शेअर बााजर खुला झाला तो वाढीने आणि त्याचवेळी सेन्सेक्सने ६० हजार अंशांचा टप्पा ओलांडल्यामुळे शेअर बाजारात जोरदार जल्लोष करऱ्यात आला. निफ्टीनेही नवीन उच्चांकाची नोंद केली असली तरी १८ हजार अंशांचा टप्पा गाठण्यात या निर्देशांकाला यश मिळू शकले नाही.
मुंबई शेअर बाजाराचा संदेदनशील निर्देशांक ६० हजार अंशांचा यप्पा पार करऱ्याची अपेक्षा या सप्ताहाच्या प्रारंभापासूनच होती. ती सप्ताहाची सांगता होताना पूर्ण झाली. बाजाराने ६० हजार अंशांचा टप्पा ओलांडताच बाजारात एकच जल्लोष केला गेला. फुगे उडवून तसेच काही ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा केला गेला. यामुळे भाद्रपदातच दिवाळी झाली.
शेअर बाजाराचा निर्देशांक ६०,३३३ असा उच्चांकी पोहोचला. त्यानंतर मात्र काही प्रमाणात विक्रीचा दबाव वाढल्याने तो काहीसा खाली आला. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स १६३.११ अंश म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून ६०,०४८.४७ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्येही ३०.२५ अंशांची वाढ होऊन तो १७,८५३.२० अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी निर्देशांकाने १७,९४७.६५ अशी नवीन उंची गाठली होती. हा निर्देशांक आजच १८ हजार अंशांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नाही.
शुक्रवारी बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांना मोठी मागणी होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मात्र खाली आलेले दिसून आले. महिंद्र ॲण्ड महिंद्र, एचसीएल आणि मारुतीच्या समभागांमध्ये चांगली वाढ झाली.
पहिल्या तीस हजारांना लागली २९ वर्षे
शेअर बाजार निर्देशांकाची वाढ ही अलिकडच्या काळामध्ये अधिक वेगाने झाली आहे. बाजारामधील व्यवहारांची संख्याही वाढलेली आहे. बाजाराचा सेन्सेक्स ४ मार्च, २०१५ रोजी ३० हजार अंशांवर पोहोचला होता. सेन्सेक्सचा प्रारंभ झाल्यापासून त्यासाठी २९ वर्षांचा काळ गेला होता. नंतरच्या ३० हजारांचा टप्पा मात्र बाजाराने अवघ्या साडेसहा वर्षांमध्ये गाठला आहे. याचाच अर्थ नंतरच्या तीस हजारांच्या वाढीसाठी आधीपेक्षा एक पंचमांश वेळच लागला आहे.