Join us

शेअर बाजार निर्देशांक ४७३ अंकांनी सुधारला

By admin | Published: January 23, 2016 3:44 AM

युरो झोनकडून मिळालेले नवे प्रोत्साहन, तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात जान आली.

मुंबई : युरो झोनकडून मिळालेले नवे प्रोत्साहन, तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात जान आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७३ अंकांनी वाढून २४,४३५.६६ अंकांवर बंद झाला. रुपयात झालेली सुधारणाही बाजाराच्या पथ्यावर पडली.या सप्ताहात सेन्सेक्स १९.३८ अंकांनी अथवा 0.0७ टक्क्यांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आठवड्यात १५.३५ अंकांनी अथवा 0.२0 टक्क्यांनी घसरला. ही सलग तिसऱ्या आठवड्यातील घसरण आहे.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच तेजीसह उघडला होता. दिवसभर तो २४ हजार अंकांच्या वरच राहिला. सत्राच्या अखेरीस ४७३.४५ अंकांची अथवा १.९८ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २४,४३५.६६ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ५१७.६३ अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४५.६५ अंकांची अथवा २ टक्क्यांची वाढ नोंदवून ७,४२२.४५ अंकांवर बंद झाला. बीएसईच्या भात्यातील गेलचा समभाग सर्वाधिक ७.९९ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल मारुती सुझुकीचा समभाग ५.५३ टक्क्यांनी वाढला. वाढ नोंदविणाऱ्या अन्य मोठ्या कंपन्यांत टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, एमअँडएम, एसबीआय, कोल इंडिया, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, एलअँडटी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, भेल, बजाज आॅटो, सन फार्मा आणि आरआयएल यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर जपानचा निक्केई ५.८८ टक्क्यांनी वाढला. शांघाय कंपोजिट १.२५ टक्क्यांनी वर चढला. हाँगकाँगचा हेंग सेंगही २.९0 टक्क्यांनी वर चढला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. (वृत्तसंस्था)