मुंबई : खरेदीचा जोर वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी ३५ अंकांनी वाढला. सेन्सेक्सने सलग चौथ्या व्यावसायिक सत्रात वाढ मिळविली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. सेन्सेक्स सकाळीच तेजीसह उघडला होता. चढ- उतारानंतर सत्राच्या अखेरीस तो ३५.४७ अंकांनी अथवा 0.१२ टक्क्याने वाढून २८,६३४.५0 अंकांवर बंद झाला. ९ सप्टेंबरनंतरची ही सर्वोच्च बंद पातळी ठरली. त्या दिवशी सेन्सेक्स २८,७९७.२५ अंकांवर बंद झाला होता. तत्पूर्वी, गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स २४५.४९ अंकांनी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.५५ अंकांनी अथवा 0.३३ टक्क्याने वाढून ८,८0८.४0 अंकांवर बंद झाला.आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.६१ टक्क्याने वाढला. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्सचा ६,0५७ कोटींचा आयपीओ आज बाजारात दाखल झाला. त्याचा फायदा कंपनीला मिळाला. टीसीएसचा समभाग १.९६ टक्क्याने वाढला. आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण राहिले. हाँगकाँगचा हँगसेंग 0.९२ टक्क्याने वाढला. शांघाय कंपोजिट 0.७७ टक्क्याने वर चढला. युरोपातही सकाळी तेजी दिसून आली. लंडनचा एफटीएसई १.१२ टक्क्याची, पॅरिसचा कॅक १.३१ टक्क्याची, तर फ्रँकफूर्टचा डॅक्स 0.७0 टक्क्याची तेजी दर्शवीत होता. >सेन्सेक्समधील २१ कंपन्यांना लाभसेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग वाढले. तेजीचा लाभ मिळालेल्या बड्या कंपन्यांत अदाणी पोर्टस्, कोल इंडिया, ओएनजीसी, एशियन पेंटस्, पॉवर ग्रीड, सिप्ला, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आरआयएल आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. व्यापक बाजारातही तेजीचे वातावरण दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.६३ टक्का आणि 0.५२ टक्का वर चढले.
सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात वाढला
By admin | Published: September 20, 2016 5:41 AM