मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीचा कल मोडीत काढताना बुधवारी सेन्सेक्सने १00 अंकांची झेप घेतली. सन फार्मा, लुपिन आणि विप्रो या कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे बळ मिळालेला सेन्सेक्स २७,९३१.६४ अंकांवर बंद झाला.चीनमधील शांघाय कंपोजिटमध्ये सुधारणा झाल्यामुळे बाजारातील धारणा मजबूत झाली. सत्राच्या सुरुवातीस शांघाय कंपोजिट ४ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर मात्र तो तेजीकडे सरकला. घट भरून काढून तो सकारात्मक पातळीवर बंद झाला. दुसरीकडे सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६५.४0 वर गेला होता. विदेशी चलनावर आधारित कंपन्यांना त्याचा लाभ झाला. सनफार्माचा समभाग ४.३२ टक्क्यांनी वाढून ९२७.२५ रुपये झाला. सिप्ला आणि डॉ. रेड्डीज यांचे समभाग अनुक्रमे १.७९ टक्के आणि १.0७ टक्के वाढले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २७,७२१.२५ अंकांवर नरमाईने उघडला होता. नंतर ब्ल्यूचिप कंपन्यांत खरेदीचा जोर वाढला आणि सेन्सेक्स तेजीत आला. २८ हजार अंकांची पातळी त्याने पुन्हा प्राप्त केली. एका क्षणी तो २८,0२१.३९ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस १00.१0 अंकांची अथवा 0.३६ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,९३१.६४ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रात सेन्सेक्सने २३५.७७ अंक गमावले होते. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ८५00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. सत्राच्या अखेरीस मात्र तो ८,४९५.१५ अंकांवर बंद झाला. २८.६0 अंकांची अथवा 0.३४ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.विभागनिहाय विचार करता आरोग्य निर्देशांक सर्वाधिक २.६३ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल टिकाऊ वस्तू निर्देशांक १.३९ टक्के, आयटी 0.७२ टक्के आणि भांडवली वस्तू निर्देशांक 0.५१ टक्के वाढला. व्यापक बाजारातील स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक 0.२४ टक्क्यांपर्यंत वाढले. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी २५५.४२ कोटी रुपयांचे समभाग विकले. आशियाई बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. युरोपीय बाजार सकाळी नरमाईचा कल दर्शवीत होते.
सेन्सेक्स १00 अंकांनी उसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2015 10:41 PM