Join us

इन्फोसिसमुळे सेन्सेक्स १७५ अंकांनी घसरला

By admin | Published: October 12, 2015 10:23 PM

इन्फोसिसने आगामी वर्षातील आपल्या डॉलरमधील उत्पन्नात घट दर्शविल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांना जबर फटका बसला.

मुंबई : इन्फोसिसने आगामी वर्षातील आपल्या डॉलरमधील उत्पन्नात घट दर्शविल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांना जबर फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७५.४0 अंकांनी घसरून २६,९0४.११ अंकांवर बंद झाला. इन्फोसिसच्या अंदाजामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा मारा सोसावा लागला.इन्फोसिसने आज आपली तिमाही आकडेवारी जाहीर केली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घसघशीत ९.८ टक्के वाढ झाली आहे. ३,३९८ कोटींचा नफा कंपनीने कमावला. त्यामुळे सकाळी कंपनीचा समभाग तेजीत होता. या नफ्याबरोबरच कंपनीने २0१६ सालासाठी जारी केलेल्या अंदाजात डॉलरमधील आपले उत्पन्न घटणार असल्याचे नमूद केले आहे. याचे वृत्त आल्यानंतर इन्फोसिसच्या समभागाने कमावलेली संपूर्ण वाढ गमावली. सत्राच्या अखेरपर्यंत कंपनीचा समभाग ३.८८ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर आयटी क्षेत्राचा निर्देशांक २.0२ टक्क्यांनी, तर टेक निर्देशांक १.८५ टक्क्यांनी घसरला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. २२५ अंकांची वाढही त्याने नोंदविली होती. इन्फोसिसचा तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्स घसरणीला लागला. संपूर्ण वाढ त्याला गमवावी लागली. सत्राच्या अखेरीस १७५.४0 अंकांची अथवा 0.६५ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,९0४.११ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४६.१0 अंकांनी अथवा 0.५६ टक्क्यांनी घसरून ८,१४३.६0 अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. बीएसई मीडकॅप 0.१५ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.0१ टक्क्यांनी वर चढला. आशियाई बाजारांत तेजी दिसून आली. युरोपीय बाजार मात्र सकाळी नरमाईचा कल दर्शवीत होते. (वृत्तसंस्था)