Join us

सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी घसरला

By admin | Published: July 10, 2015 12:56 AM

भारतीय शेअर बाजारांत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४.0६ अंकांनी घसरून २७,५७३.६६ अंकांवर बंद झाला.

मुंबई : भारतीय शेअर बाजारांत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४.0६ अंकांनी घसरून २७,५७३.६६ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. २७,७९८.१३ अंकांपर्यंत त्याने मजल मारली होती. त्यानंतर विक्रीचा मारा झाल्याने सेन्सेक्स घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ११४.0६ अंकांची अथवा 0.४१ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,५७३.६६ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा व्यापक आधारावरील निफ्टी ३४.५0 अंकांनी अथवा 0.४१ टक्क्यांनी घसरून ८,३२८.५५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,४00.३0 आणि ८,३२३ अंकांच्या मध्ये हेलकावे खाताना दिसून आला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २0 कंपन्यांचे समभाग घसरले. १0 कंपन्यांचे समभाग वाढले. बड्या कंपन्यांपैकी वेदांता, टीसीएस, बजाज आॅटो, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि विप्रो यांचे समभाग घसरले. भेल, एलअँडटी, हिंदाल्को, हीरोमोटोकॉर्प, भारती एअरटेल आणि लुपिन यांचे समभाग मात्र वाढले. अन्य आशियाई बाजारांत तेजीचा कल दिसून आला. कालच्या ऐतिहासिक घसरणीनंतर चीनमधील शेअर बाजारांत आज सुधारणा दिसून आली. शांघाय कंपोजिट ५.७६ टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग ३.७३ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई 0.६0 टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारात सकाळी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.