मुंबई/जळगाव : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही तासांतच २३०० अंकांची उसळी घेणारा भांडवली बाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर झेपावला. ५० हजारांच्या बिंदूला स्पर्श करत निर्देशांक मंगळवारी अखेरीस ४९,७९७ अंशांवर स्थिरावला. एकीकडे भांडवली बाजारात तेजीचे वातावरण असताना सराफा बाजारात मात्र निरुत्साह होता. सोने आणि चांदीच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोन्याच्या भावात तोळ्यामागे ४०० रुपये तर चांदीच्या दरात किलोमागे १ हजार रुपयांची घसरण निदर्शनास आली. अर्थसंकल्प जबरदस्त स्वागतअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भांडवली बाजाराने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तोच कल मंगळवारीही कायम राहिला. अर्थसंकल्पात प्रामुख्याने भांडवली खर्चाला प्राधान्य देण्यात आल्याने भांडवली बाजारात उत्साह संचारला असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मंगळवारी निर्देशांक १२०० अंकांनी वाढून ४९ हजार ७९७ अंशांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारही ३६६ अंशांनी वाढून १४,६४७ अंशांवर स्थिरावला. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, एल ॲण्ड टी, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल यांचे समभाग तेजीत होते.सराफा बाजारात निरुत्साह अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे भाव कमी झाले. चांदीत १ हजाराने घसरण होऊन ती ७३ हजारांवर आली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४९ हजार ५०० रुपयांवर आले. अर्थसंकल्पात सुवर्ण बाजारासंदर्भात काही घोषणा न झाल्यास त्यांचे भाव वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात पाच टक्क्याने कपात करण्यात आल्याने दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण नोंदवली गेली.
सेन्सेक्सची उसळी; सोने-चांदीची आपटी, शेअर बाजारात उत्साह; विदेशी निधीचाही ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 7:07 AM