Join us  

टेक, कमॉडिटी क्षेत्रात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स तेजीत!

By admin | Published: October 10, 2015 3:23 AM

एक दिवसाच्या ब्रेकनंतर शेअर बाजारात खरेदी वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा वर चढले. विशेषत: टेक आणि कमॉडिटी क्षेत्रात खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून आले. २३३.७0 अंकांनी

मुंबई : एक दिवसाच्या ब्रेकनंतर शेअर बाजारात खरेदी वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा वर चढले. विशेषत: टेक आणि कमॉडिटी क्षेत्रात खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून आले. २३३.७0 अंकांनी वाढलेला सेन्सेक्स २७,0७९.५१ अंकांवर बंद झाला. पुढील आठवड्यापासून कंपन्यांच्या तिमाही कामगिरीची आकडेवारी जाहीर व्हायला सुरुवात होईल. सोमवारी इन्फोसिसचे तिमाही आकडे जाहीर होणार आहेत. त्याआधी बाजारात तेजी दिसून आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढत गेला. सत्राच्या अखेरीस २३३.७0 अंकांची अथवा 0.८७ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २७,0७९.५१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही २१ आॅगस्टनंतरची सर्वोच्च पातळी ठरली आहे. काल सेन्सेक्स १९0.0४ अंकांनी घसरला होता. त्याआधी तो सलग सहा दिवस तेजीत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळी तेजीनेच उघडला होता. त्यानंतर तो ८,२३२.२0 अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस थोडा खाली येऊन तो ८,१८९.७0 अंकांवर बंद झाला. ६0.३५ अंकांची अथवा 0.७४ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. या आठवड्यात सेन्सेक्स ८५८.५६ अंकांनी म्हणजेच ३.२७८ टक्क्यांनी वाढला. निफ्टी २३८.८0 अंकांनी अथवा ३ टक्क्यांनी वाढला. सलग दुसऱ्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकांनी साप्ताहिक पातळीवर वाढ मिळविण्यात यश मिळविले आहे. वेदांताच्या समभागात तब्बल ११.५८ टक्क्यांची वाढ झाल्याने सेन्सेक्सला लाभ झाला. टाटा स्टीलचा समभाग ४.२६ टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्समधील इतर लाभधारक कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, गेल, हिंदाल्को, सिप्ला, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे. व्यापक बाजारांतही तेजीचे वातावरण दिसून आले. स्मॉलकॅप निर्देशांक 0.१९ टक्क्यांनी, तर मीडकॅप निर्देशांक 0.0६ टक्क्यांनी वाढला. जागतिक बाजारांतही तेजीचे वातावरण दिसून आले. बहुतांश आशियाई बाजार वर चढले. युरोपीय बाजारांत सकाळी तेजी दिसून आली. (वृत्तसंस्था)