मुंबई : ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सलग दहाव्या महिन्यात उणे राहिल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजारांत तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४६ अंकांनी वाढून २५,८५६.७0 अंकांवर बंद झाला. या बरोबर सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
जुलैमधील औद्योगिक उत्पादन अपेक्षेपेक्षा चांगले राहिले आहे. यामुळे बाजारात आधीच उत्साह होता. महागाईच्या आकडेवारीने त्याला आणखी बळ दिले. याशिवाय रुपयाने चांगली कामगिरी करून त्यात आणखी भर घातली.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला आहे. सत्राच्या अखेरीस तो ७,८७२.२५ अंकांवर बंद झाला. ८२.९५ अंकांची अथवा १.0६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवसभरात २५,८९१.७३ अंकांच्या उंचीवर गेला होता. सत्राच्या अखेरीस मात्र तो २४६.४९ अंकांची अथवा 0.९६ टक्क्यांची वाढ नोंदवून २५,८५६.७0 अंकांवर बंद झाला. ३१ आॅगस्टनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स १0९.३७ अंकांनी घसरला होता.
दोन्ही निर्देशांक दिवसभर अस्थिर होते. ते सतत खाली-वर होताना दिसून आले. सत्राच्या अखेरीस मात्र ते वाढीसह बंद झाले. दोन्ही निर्देशांक आता दोन आठवड्यांच्या उंचीवर पोहोचले आहेत.
चीनमधील अनिश्चितता आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीची भीती अजूनही बाजाराच्या मानगुटीवर बसलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यावर या दोन्ही गोष्टींची छाया राहील, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले.
योग्य आणि विश्वसनीय करप्रणाली देण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज जागतिक गुंतवणूकदारांना दिले आहे. त्यामुळे बाजारातील धारणा मजबूत होण्यास मदत झाली.
इस्पात आयातीवर २0 टक्के सेफगार्ड शुल्क लावण्याचा निर्णय सेफगार्ड बोर्डाने वैध ठरविल्यामुळे धातू निर्देशांक पुन्हा एकदा तेजीत आला. वेदांता, टाटा स्टील आणि हिंदाल्को या बड्या कंपन्यांचे समभाग ४.0२ टक्क्यांपर्यंत वाढले. (वृत्तसंस्था)
दरकपातीच्या अपेक्षेने सेन्सेक्स तेजीत
ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सलग दहाव्या महिन्यात उणे राहिल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजारांत
By admin | Published: September 15, 2015 03:46 AM2015-09-15T03:46:31+5:302015-09-15T03:46:31+5:30