मुंबई - गेल्या आठवड्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतल्याचे दिसत आहे. शेअर बाजारातील या वेगवान उलाढालींमुळे गुंतवणूकदार घाबरुन किंवा घाई-घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. सुप्रसिद्ध अर्थविश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी शेअर बाजाराच्या स्थितीचे विश्लेषण लोकमतच्या वाचकांसाठी केले आहे.
आज सेन्सेक्सने 36 हजारांचा टप्पा ओलांडला आणि निफ्टीनेही 11 हजारांचा टप्पा ओलांडला, त्यानंतर काही चढ-उतार दिसून आले. आता अशी अचानक उसळी आल्यावर गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. गेल्या 20 ते 25 वर्षांचा विचार केल्यास अशी स्थिती जेव्हा जेव्हा आली तेव्हा एखादा संबंधित घोटाळा उघडकीस आला होता. मात्र सध्या तशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. त्याचप्रमाणे तसे कोणतेही संकेतही दिसत नाहीत. त्यामुळे सध्या तरी कोणतीही चिंता करण्याची स्थिती नाही. जगातील अनेक देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना केली तर भारत आणि चीन यांची आर्थिक प्रगती सर्वात चांगली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार याच देशांना जास्त पसंती देणार यात शंका नाही. गेल्या 2 ते अडिच वर्षांमध्ये भरताने इतर देशांशी केलेल्या करारांचाही यावर परिणाम दिसून येतो. तसेच विदेशी वित्तसंस्था देशामध्ये पैसे गुंतवत आहेत, त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येतो.
आताच्या बाजाराचं चित्र पाहिलं तर मोठ्या भांडवली कंपन्यांची वाढ आणि उलाढाल यांच्यामध्ये सातत्य आहे. मात्र लघू भांडवली कंपन्यांचे तसे दिसून येत नाही. याचाच अर्थ बाजार जेव्हा सिलेक्टिव्ह असतो तेव्हा कोणताही घोटाळा असत नाही. हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी घोटाळे केले तेव्हा एकदम साध्या, ज्या कंपन्यांमध्ये कोणीही गुंतवणूक करायचे नाही त्या कंपन्यांचेही भाव वाढले होते. पण सध्या ते दिसत नाही त्यामुळे कोणताही धोका नाही.विदेशी संस्था जेव्हा समभाग विकतात तेव्हा ते घेण्यासाठी आपल्या देशी संस्था आणि विशेषतः म्युच्युअल फंड्स ते घेण्यासाठी तयारी दर्शवत आहेत. हे एक चांगले चित्र म्हणता येईल. गुंतवणूकदारांनी अशा स्थितीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे समभागच घ्यावेत. तसेच म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घमुदतीसाठी पैसे गुंतवायला हरकत नाही. सातत्यपूर्ण उलाढाल असणारे समभाग शोधून तेच घ्यावेत. ही काळजी गुंतवणूकदारांनी घ्यायला हवी.