जागतिक पातळीवर सुधारलेले आर्थिक वातावरण, खनिज तेलाच्या किमतीमध्ये झालेली अल्पशी वाढ, विविध आस्थापनांनी दिलेले तिसऱ्या तिमाहीचे आशादायक निकाल, विविध देशांच्या व्याजदराबाबत जाहीर झालेले धोरण अशा वातावरणात गतसप्ताहात मुंबई शेअर बाजार वाढला. गेले सलग तीन आठवडे होत असलेली बाजाराची घसरण थांबल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुटी असल्याने बाजारात चारच दिवस व्यवहार झाले. या सर्वच दिवशी बाजार वाढला. सप्ताहात बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ४३५ अंश म्हणजेच १.८ टक्क्यांनी वाढून २४८७०.६९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १४१.१० अंशांनी वाढून ७५६३.५५ अंशांवर बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ झाली. हे निर्देशांक अनुक्रमे २.२ आणि २.६ टक्क्यांनी वाढले. कॅपिटल गुडस् आणि बॅँकेक्स वगळता अन्य निर्देशांक वाढले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होऊन त्यामध्ये व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. या बरोबरच बॅँक आॅफ जपानच्या पतधोरण ठरविणाऱ्या समितीने व्याजदर उणे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. या दोन्ही निर्णयांमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले. परिणामी सर्वच ठिकाणचे बाजार तेजीचा नूर दाखवू लागले. त्यातच चीनच्या मध्यवर्ती बॅँकेने बाजाराला गरज असलेला निधी मिळावा यासाठी ४४० अब्ज युआनचे पॅकेज जाहीर केले. यामुळे बाजार खुललेच.
गेले काही महिने सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांनी भारतीय बाजारातील आपली विक्री कायम ठेवली आहे. गतसप्ताहात या संस्थांनी ११६३.७२ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत. या संस्थांच्या विक्रीनंतरही बाजारामध्ये झालेली वाढ हे चांगले लक्षण असल्याचे मानले जात आहे. गुंतवणुकदार आता बाजारात सक्रीय झाले असून अर्थसंकल्पापूर्वी तेजीची एखादी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.
गतसप्ताहात फ्युचर्स अॅण्ड आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती होती. या व्यवहारांमध्ये फारशी तेजी दिसून आली नाही. यामुळे बाजारामध्ये खरेदीचा मूड दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांची आकडेवारी जाहीर झाली.
यामध्ये देशाची अर्थसंकल्पिय तूट ४.९ लाख कोटींवर पोहोचली आहे. वर्षभरामध्ये ५.५ लाख कोटींची तूट अपेक्षित असताना नऊ महिन्यातच ही तूट सुमारे ८८ टक्क्यांवर गेल्याने आगामी काळात अर्थव्यवस्थेवर आणखी दडपण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संवेदनशील निर्देशांक पुन्हा २५ हजारांच्या निकट
जागतिक पातळीवर सुधारलेले आर्थिक वातावरण, खनिज तेलाच्या किमतीमध्ये झालेली अल्पशी वाढ, विविध आस्थापनांनी दिलेले तिसऱ्या तिमाहीचे आशादायक निकाल
By admin | Published: February 1, 2016 02:19 AM2016-02-01T02:19:42+5:302016-02-01T02:19:42+5:30