नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये ग्राहकांचा विश्वास घसरून सहा वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. रोजगार, उत्पन्न आणि खर्च याबाबत कुटुंबांतील विश्वासात घसरण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ‘ग्राहक धारणा सर्वेक्षणा’त ही माहिती देण्यात आली आहे. यातील चालू परिस्थितीतील निर्देशांक आणि भविष्यकालीन अपेक्षा निर्देशांक या दोन्हीतही घसरण झाली आहे.
चालू परिस्थितीतील निर्देशांक (सीसीआय) ९५.७ अंकावरून घसरून ८९.४ वर गेला आहे. २०१३ तील सप्टेंबरमध्ये तो ८८ वर होता. एकूणच अर्थव्यवस्था आणि रोजगार यासंबंधीची धारणाही घसरली आहे. येणाऱ्या वर्षात उत्पन्नाबाबतही लोक कमी आशावादी आहेत.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४७.९ टक्के कुटुंबांना असे वाटते की, अर्थव्यवस्थेची एकूणच स्थिती विकोपाला गेली आहे. डिसेंबर, २०१३ मध्ये ५४ टक्के उत्तरदात्यांनी परिस्थिती वाईट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, प्रथमच अर्थव्यवस्थेवरचा विश्वास इतका डळमळीत झाला आहे. ३१.८ टक्के उत्तरदात्यांना वाटते की, आगामी वर्षात परिस्थिती आणखी विकोपाला जाईल. सप्टेंबर, २०१३ मध्ये ३८.६ लोकांनी आगामी वर्षाबद्दल अशीच निराशा व्यक्त केली होती. ५२.५ टक्के उत्तरदात्यांना वाटते की, देशातील रोजगाराची स्थिती विकोपाला गेली आहे. आगामी वर्षात ती आणखी विकोपाला जाईल, असे ३३.४ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले आहे.
उत्पन्न वाढण्याची आशावैयक्तिक उत्पन्नाबाबत तुलनेने थोडीसी बरी स्थिती सर्वेक्षणात आढळून आली. आपले वैयक्तिक उत्पन्न घटल्याचे केवळ २६.७ टक्के लोकांनी म्हटले. नोव्हेंबर, २०१७ मध्ये २८ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले होते. आगामी वर्षात आपले वैयक्तिक उत्पन्न वाढेल, असे ५३ टक्के लोकांनी वाटते. वैयक्तिक उत्पन्न घटेल, असे केवळ ९.६ टक्के लोकांना वाटते.