गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लस हा उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात सीरम आणि भारत बायोटेक कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन करत आहेत. तसंच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आपल्या कोविशिल्ड या लसीचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लवकरच आपण भारतात परतणार असल्याचं सांगत पुण्यातील प्रकल्पाक कोविशिल्डचं उत्पादन वेगानं होत असल्याचं म्हटलं आहे.
"भारतात परतल्यानंतर कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची समीक्षा करणार आहे," असंही पूनावाला यांनी नमूद केलं. काही दिवसांपूर्वी पूनावाला हे लंडनला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य करत आपल्याला धमक्या मिळत असल्याचं म्हटलं होतं. "मला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे, बड्या उद्योगपतींचे व अन्य लोकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांनाच कोविशिल्ड लस त्वरित हवी आहे. प्रत्येकाच्या या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तिचा पुरवठा लवकर व्हावा या आग्रहापायी फोन करणारे माझ्याशी आक्रमक सूरात बोलत असतात. मात्र या सर्वांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे," असं पूनावाला म्हणाले होते.
ट्वीट करत दिली माहिती
यादरम्यान अदर पूनावाला यांनी कंपनीचे पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्सशी इंग्लंडमध्ये मीटिंग केली. "आमचे पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्ससोबत पार पडलेली मीटिंग उत्तम होती. पुण्यात कोविशिल्डचं उत्पादन वेगानं होत आहे. काही दिवसांत परत येऊन उत्पादनाची समीक्षा करेन," असं पूनावाला म्हणाले.
Had an excellent meeting with all our partners & stakeholders in the U.K. Meanwhile, pleased to state that COVISHIELD’s production is in full swing in Pune. I look forward to reviewing operations upon my return in a few days.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 1, 2021
Y दर्जाची सुरक्षा
अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने नुकतीच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एक अधिकारी प्रकाशकुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून तशी विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोरोना साथीविरोधात सुरू केलेल्या लढ्यात सीरम इन्स्टिट्यूट जय्यत तयारीनिशी सहभागी झाली आहे. अशा वेळी अदर पूनावाला यांना मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. पूनावाला यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपविण्यात आली आहे.