करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शनबाबत (Dharma Production) मोठी बातमी समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला धर्मा प्रॉडक्शनमधील ५० टक्के हिस्सा विकत घेणार आहेत. पूनावाला हा हिस्सा १००० कोटी रुपयांना विकत घेत आहेत. या व्यवहारात करण जोहरच्या चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्मिती, तसंच वितरण कंपनी धर्मा प्रॉडक्शनचं मूल्यांकन सुमारे २००० कोटी रुपये आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
प्रायव्हेट कॅपॅसिटीद्वारे गुंतवणूक
सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला सिरीन प्रॉडक्शनच्या माध्यमातून धर्मा प्रॉडक्शनमध्ये प्रायव्हेट कॅपॅसिटीद्वारे गुंतवणूक करत आहेत. उर्वरित हिस्सा धर्मा प्रॉडक्शनकडे राहणार आहे. करण जोहर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अपूर्व मेहता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील.
सध्या कोणाचा किती हिस्सा?
धर्मा प्रॉडक्शनमध्ये करण जोहरचा ९०.७ टक्के हिस्सा आहे. तर त्याची आई हिरू जोहर यांचा कंपनीत ९.२४ टक्के हिस्सा आहे. धर्मा प्रॉडक्शन गेल्या काही काळापासून गुंतवणुकीच्या शोधात आहे. धर्मा प्रॉडक्शन संजीव गोएंका यांच्या सारेगामासह अनेक बड्या कंपन्या आणि उद्योजकांशी चर्चा करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ सिनेमासोबतही चर्चेचं वृत्त समोर आलं होतं. राईन ग्रुप हा या कराराचा सल्लागार होता.
महसुलात जवळपास ४ पटीनं वाढ
धर्मा प्रॉडक्शनच्या महसुलात आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जवळपास ४ पटीनं वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा महसूल १०४० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी धर्मा प्रॉडक्शनचा महसूल २७६ कोटी रुपये होता. मात्र, कंपनीचा निव्वळ नफा ५९ टक्क्यांनी घसरून ११ कोटी रुपयांवर आला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या खर्चात ४.५ पटीनं वाढ झाल्यानं निव्वळ नफ्यात घट झाली आहे.
यश जोहर यांनी केलेली सुरुवात
१९७६ मध्ये यश जोहर यांनी या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. त्याxचा पहिला चित्रपट दोस्ताना होता ज्यात अमिताभ बच्चन यांनीही भूमिका साकारली होती. करण जोहरनं वयाच्या २५ व्या वर्षी 'कुछ कुछ होता है' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यानं कभी खुशी कभी गम, ये जवानी है दिवानी, 2 स्टेट्स, कपूर अँड सन्स आणि डिअर जिंदगी सारखे हिट चित्रपटही केले.