नवी दिल्ली - व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे.
तुमची काळजी करणाऱ्या तुमच्या लोकांसोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे किती जोडले आहात, हे मला माहिती आहे. या सेवांमुळे ती बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच, आमच्याकडून झालेल्या व्यत्ययाबद्दल मी आपणा सर्वाची माफी मागतो, अशी फेसबुक पोस्ट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली आहे.
भारतीय वेळेनुसार पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास मार्कनेही ही पोस्ट केली आहे. दरम्यान, या सेवा बंद झाल्यामुळे ट्विटरवर फेसबुकचा ट्रेंड सुरू होता. अनेकांनी आपल्या मनातील भावना आणि ही माहिती देण्यासाठी ट्विटर व टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म वापरला.
We’re aware that some people are having trouble accessing our apps and products. We’re working to get things back to normal as quickly as possible, and we apologize for any inconvenience.
— Facebook (@Facebook) October 4, 2021
सोमवारी रात्री अचानक फेसबुक आणि व्हॉट्सएप डाऊन झाल्याने अनेकांनी आपले इंटरनेट कनेक्शन चेक करायला सुरुवात केली. काहींना वाटले हा केवळ आपल्या एकट्यापुरताच विषय आहे. मात्र, थोड्यात वेळात एकमेकांमध्ये याची चर्चा सुरू झाली, तर ट्विटरही हीच चर्चा रंगली. त्यानंतर, काही वेळांतच माध्यमांमध्ये ही बातमी आल्याने हे सर्व्हर डाऊन झाल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. त्यामुळे, भारतात अनेकांनी गुड नाईट करुन गादीवर आपलं अंग टाकून निद्रावस्था धारण केली.
नेमकं काय झालं ?
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.