नवी दिल्ली - व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे.
तुमची काळजी करणाऱ्या तुमच्या लोकांसोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे किती जोडले आहात, हे मला माहिती आहे. या सेवांमुळे ती बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच, आमच्याकडून झालेल्या व्यत्ययाबद्दल मी आपणा सर्वाची माफी मागतो, अशी फेसबुक पोस्ट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली आहे.
नेमकं काय झालं ?
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.