मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सात दिवसांच्या मंदीला मंगळवारी अखेर ब्रेक लागला. राजधानी दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला विक्रमी बहुमत मिळाल्यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२८.२३ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९.२0 अंकांनी वाढला.मंगळवारचा दिवस बाजारांसाठी अत्यंत अस्थिर राहिला. बाजार सतत खाली-वर होताना दिसून आले. बाजाराची सकाळ तशी तेजीने अवतरली होती. सेन्सेक्स २८,१२२.४८ अंकांवर उघडला. दुपारपूर्वी ४00 अंकांची मोठी उसळी घेऊन सेन्सेक्स २८,६३३.७२ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर बाजार खाली आला. तरीही सत्रअखेरीस १२८.२३ अंक अथवा 0.४५ टक्के वाढ नोंदवून सेन्सेक्स २८,३५५.६२ अंकांवर बंद झाला. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७.४ टक्क्यांपर्यंत वर चढू शकते, असा नवा अंदाज काल व्यक्त करण्यात आला होता. त्याचा लाभही सेन्सेक्सला झाला. दुपारनंतरच्या घसरणीत सेन्सेक्स २८,0४४.४९ अंकांपर्यंत खाली आला होता. तथापि, ही घसरण त्याने नंतर भरून काढली. काल शेअर बाजार ४९0 अंकांनी घसरला होता. दिल्ली विधानसभेत भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज जनमत चाचण्यांनी व्यक्त केल्यामुळे बाजार घसरला होता. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्सने १,४५४.३८ अंक गमावले आहेत. हे नुकसान ४.९0 टक्के आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांचा समावेश असलेला सीएनएक्स निफ्टी ३९.२0 अंक अथवा 0.४९ टक्क्यांच्या तेजीसह ८,५६५.५५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,६४६.२५ अंकांपर्यंत वर चढला होता. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी १८ कंपन्यांचे समभाग वर चढले. १२ कंपन्यांचे समभाग घसरले. तेजीचा लाभ मिळविणाऱ्या बड्या कंपन्यांत टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, एसबीआय, सेसा स्टरलाईट, एम अँड एम, गेल इंडिया आणि कोल इंडिया यांचा समावेश आहे. याशिवाय हिंदाल्को, टाटा पॉवर, सिप्ला, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांचे समभागही वाढले. घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूल आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,४0२ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३३३ कंपन्यांचे समभाग वाढले. ११0 कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,८८३.६९ कोटी झाली. काल ती २,९५५.११ कोटी रुपये होती.