नवी दिल्ली : देशाच्या दिल्ली व मुंबईसह ७ प्रमुख शहरांमधील तब्बल २ लाख १८ हजार घरांचे बांधकाम २०११ पासून रखडले आहे. या घरांची एकूण किंमत १.५६ लाख कोटी रुपये इतकी आहे. देशातील रखडलेल्या घरांची आकडेवारी प्रॉपर्टी कन्सल्टंट जेएलएल इंडियाने प्रसिद्ध केली आहे. यामुळे ज्यांनी या घरांमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्या ग्राहकांची कोंडी झाली आहे. त्यांना कर्जाचे हप्ते तर भरावे लागत आहेत आणि घर कधी ताब्यात मिळेल, याची खात्री नाही.दिल्ली-एनसीआरमधील रिअल एस्टेट प्रकल्पांची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. देशातील रखडलेली ७१ टक्के घरे एकट्या दिल्ली व एनसीआर (राष्ट्रीय राजधानी परिसर) भागांतील आहेत. येथील अनेक बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध विविध न्यायालयांत खटले सुरू असून, काही प्रकरणांत न्यायालयाने कारवाईही सुरू केली आहे.या आकडेवारीनुसार, देशातील ७ प्रमुख शहरांमध्ये २ लाख १८ हजार ३६७ घरांचे बांधकाम अतिशय संथ गतीने चालू आहे. या घरांचे एकूण मूल्य १,५५,८०४ कोटी रुपये इतके आहे. दिल्ली-एनसीआरबरोबरच मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद व पुणे या शहरांमधील घरांची बांधकामेदेखील रखडली आहेत. रखडलेल्या २ लाख १८ हजार घरांपैकी ३० हजार घरांशी संबंधित प्रकल्प रद्दच करण्यात आले आहेत.चेन्नईतील ८,१३१ घरांची बांधकामे रखडली आहेत. त्यांची बाजारातील किंमत ४,४७४ कोटी रुपये आहे, तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील ५,४६८ घरांची कामे संथ गतीने सुरू असून त्यांची किंमत २,७६८ कोटी रुपये इतकी आहे.९१ टक्के घरे दिल्ली व मुंबईतीलजेएलएलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील १ लाख ५४ हजार ७५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले नसून, या घरांची एकूण किंमत ८६,८२४ कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबईत ५६,४३५ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ४३ हजार ४४९ घरांची कामे अपूर्ण आहेत. रखडलेल्या प्रकल्पांपैकी ९१ टक्के प्रकल्प मुंबई, दिल्ली-एनसीआरमधील आहेत.
सात शहरांतील २ लाख घरांची कामे रखडली, ग्राहकांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 4:02 AM