Join us  

रोजगारनिर्मिती सात वर्षांच्या नीचांकावर - राष्ट्रपती

By admin | Published: November 18, 2016 1:41 AM

देशातील रोजगार निर्मिती सात वर्षांच्या नीचांकावर गेली असून, हे चित्र असेच राहिल्यास देशासाठी घातक ठरू शकते, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी दिला.

नवी दिल्ली : देशातील रोजगार निर्मिती सात वर्षांच्या नीचांकावर गेली असून, हे चित्र असेच राहिल्यास देशासाठी घातक ठरू शकते, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी दिला.राष्ट्रपती भवनात आयोजित शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना मुखर्जी म्हणाले की, रोजगार निर्मितीचे आकडे सात वर्षांत नीचांकी पातळी दर्शवित आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांत वाढत असलेल्या असंतोषाकडे लक्ष वेधताना मुखर्जी यांनी अभ्यासासाठी शिक्षण संस्थांत शांतता आणि सौहार्दाचे वातावरण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले, तसेच शैक्षणिक नेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन सरकारला केले. मुखर्जी म्हणाले की, देशातील शिक्षण संस्था गुणवत्तेच्या चुंबक बनायला हव्या. ब्रेन ड्रेनची जागा ब्रेन रेनने घ्यायला हवी. भारतात भरपूर गुणवत्ता आहे. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. काम करू शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तथापि, जास्तीत जास्त लोकांना काम करण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी रोजगाराची जास्तीत जास्त निर्मिती होणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती घटली, तर ही बाब घातक ठरेल. आपल्या शिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या व्हायला हव्यात. असे झाले, तर आपण ब्रेन नेटवर्क विकसित करू शकू. त्यातून ब्रेन ड्रेन संपून ब्रेन रेन निर्माण होईल