Quick Commerce Market : इंटरनेटचं स्पीड वाढावं तसं प्रत्येकाच्या आयुष्याचा वेग प्रचंड वाढला आहे. इथं कोणालाही थांबायला वेळ नाही. लोकांना आता एकदिवसीय क्रिकेट नाही तर वेगाने खेळला जाणारा टी २० चा सामाना पाहायला आवडतो. क्विक कॉमर्स क्षेत्राने तर यात आणखी भर टाकली. पूर्वी काही खरेद करायचं म्हटलं तर आवरा, गाडी काढा, बाजारात जा, मग खरेदी करा. आता गोष्टी इतक्या बदलल्या आहेत की १० मिनिटांत हवी ती गोष्ट घरपोच होत आहे. क्विक कॉमर्स क्षेत्र ग्राहकांच्या बेडरुपर्यंत पोहचलं आहे.
क्विक कॉमर्सवर सर्व काही उपलब्ध
क्विक कॉमर्सबद्दल बोलायचं झालं तर आज या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ सर्व काही उपलब्ध आहे. आता क्विक कॉमर्सवर फक्त स्नॅक्स आणि भाज्याच नाही तर सेक्स टॉयही विकल्या जातात. हे प्रॉडक्ट 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत घरी पोहचतात. हॉटेल रूम सर्व्हिसपेक्षा वेगवान. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म घरीच नाही तर हॉटेल्सच्या रुमपर्यंत वस्तू डिलिव्हर करत आहे.
सेक्स प्रॉडक्टची खरेदी वाढली
कंडोम, व्हायब्रेटर, लुब्रिकेंट इत्यादींसारख्या लैंगिक आरोग्याच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एखाद्या केमिस्टच्या दुकानात जाऊन या वस्तू मागायलाही आजही लाज वाटते. मात्र, ती अडचण इथे दूर झाल्याने कंडोम सोडा आता प्लेजर प्रॉडक्टची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशात सेक्सुअल वेलनेसचा उद्योग तेजीत आहे. याला मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, लैंगिक आरोग्याबाबत वाढती जागरुकता आणि क्विक कॉमर्सद्वारे घरपोच वस्तू पोहोचणे कारणीभूत आहे. मार्केट इंटेलिजन्स फर्म एस्ट्यूट एनालिटिकाच्या जुलै महिन्याच्या अहवालानुसार सध्या बाजाराची किंमत सुमारे १.२ अब्ज आहे. त्यांची वार्षिक विक्री ९० लाख युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. सेक्स टॉईजच्या खरेदीत दरवर्षी २५ टक्के वाढ झाली आहे.
क्विक कॉमर्सला पहिली पसंती
क्विक कॉमर्स हे अनेक सेक्सुअल वेलनेस स्टार्टअपसाठी विक्रीचे प्राथमिक स्त्रोत बनले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वरीत ऑर्डर करणे आणि आवश्यकतेनुसार त्वरित वितरण. स्विगी इन्स्टामार्टच्या अहवालात असे आढळून आले आहे की प्रत्येक १४० ऑर्डरपैकी एकामध्ये सेक्सुअल वेलनेसचे उत्पादन समाविष्ट होते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हँडकफ्स आणि डोळ्यांवर बांधायची पट्टी या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला विक्री तेजीत
ब्लिंकिटच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये एकट्या मुंबईने १७,५८,७२० कंडोम ऑर्डर केले. ब्लिंकिटचे संस्थापक अल्बिंदर धिंडसा यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले की नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आलू भुजिया आणि बर्फाचे तुकड्यांसोबत १.२ लाख कंडोम वितरित केले गेले.
ऑर्डर हिस्ट्री राहत नाही
क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन खरेदी केल्यास तुम्ही तुमची ऑर्डर हिस्ट्री डिलीट करू शकता. यामुळे प्रायव्हसी जपण्याचा पर्याय देखील लोकांना मिळत आहे. त्यासोबत अनेक प्लॅटफॉर्म ईएमआयचा पर्याय देखील देतात. यामुळे अनेकजण आता या प्लॅटफॉर्मला पसंती देत आहेत. गेल्या काही वर्षात देशात अनेक बदल होत आहेत. लोक आता सेक्सकडे फक्त क्रिया नाही तर आनंद म्हणून देखील पाहतात. त्यामुळेच अलीकडच्या काळात अशा वस्तूंची विक्री वाढल्याचे दिसत आहे.