मुंबई : ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२३ मध्ये आयटी- सॉफ्टवेअर, दूरसंचार आणि शिक्षण क्षेत्रात नकारात्मक कल आल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी भरतीत १२ टक्के घसरण झाली.
‘नोकरी जॉबस्पीक इंडेक्स’नुसार, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये २,४३३ कार्यालयीन कर्मचारी भरण्यात आले. २०२२ मध्ये या काळात २,७८१ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. ‘नोकरी जॉबस्पीक’ हा एक मासिक निर्देशांक आहे. नोकरी बाजार आणि नोकरी डॉट कॉमच्या बायोडेटा डेटाबेसवरून तो काढला जातो. त्यातून देशातील नोकरभरतीची स्थिती कळते.
आयटी क्षेत्रात १ टक्का वाढ
नोकरी डॉट कॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले की, तेल व गॅस, औषधी आणि विमा यांसारख्या मुख्य बिगर-आयटी क्षेत्रांत सणासुदीच्या हंगामात वृद्धी दिसणे उत्साहवर्धक आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये आयटी क्षेत्रात १ टक्का वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे आम्हाला पुढील महिन्यांतील कलांची अतीव प्रतीक्षा आहे.
मासिक कार्यालय भाड्यांत ७ टक्के वाढ
७ मोठ्या शहरांतील प्रमुख कार्यालयांचे मासिक भाडे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) ७ टक्के वाढून ८३ रुपये प्रति चौरस फूट झाले. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ॲनारॉकने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ७ प्रमुख शहरांतील प्रथम श्रेणी कार्यालयांचे मासिक भाडे आदल्या वर्षी समान कालावधीत ७७.५ रुपये होते. नवीन कार्यालयांचा पुरवठा यंदा ५ टक्के वाढला.