- प्रसाद गो. जोशीजगावर दाटून आलेले मंदीचे कृष्णमेघ, त्यातच भारतामधील घटलेले औद्योगिक उत्पादन, विविध आस्थापनांच्या तिमाही निकालांमधून फारसे काही हाती न लागणे आणि बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धाची परिस्थिती, यामुळे शेअर बाजारात मंदीचे वातावरण होते. परकीय वित्तसंस्थांनी कायम राखलेली विक्री आणि देशांतर्गत वित्तसंस्थांची खरेदी यामुळेही काही हालचाल दिसून आली.
गतसप्ताहामध्ये दोन सुट्ट्या आल्यामुळे केवळ तीनच दिवस शेअर बाजारात व्यवहार झाले. सप्ताहाची सुरुवात तेजीने (३७७५५.१६) झाली. मात्र, हाच निर्देशांकाचा सप्ताहातील अत्युच्च बिंदू राहिला. त्यानंतर, संवेदनशील निर्देशांक ३६,८८८.४९ अंशांपर्यंत जाऊन ३७,३५०.३३ अंशांवर विसावला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत तो २३१.५८ अंश (०.६ टक्के) कमी झाला.राष्टÑीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) ६१.८५ अंश (०.५टक्के) घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११,०४७.८० अंशांवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून आली. मिडकॅप १३,४९०.९० अंशांवर (घट १७९.१५ अंश म्हणजेच १.३१ टक्के), तर स्मॉलकॅप १२,५८४.५९ अंशांवर (घट ११४.९१ अंश म्हणजे ०.९० टक्के) बंद झाले आहेत.
अतिश्रीमंतांवरच्या प्रस्तावित अधिभाराबाबत केंद्राने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी चालू महिन्यात ८,३१९ कोटी रुपये काढून घेतले. गतसप्ताहात देशी वित्तसंस्थांनी २,८७९.६३ कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला.
देशाच्या आयात-निर्यात व्यापारामधील दरी कमी झाली असली, तरी औद्योगिक उत्पादनामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वाहन उद्योगाला याचा फार मोठा फटका बसला आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका सर्वच अर्थव्यवस्थांना बसत असून, त्यामुळे जागतिक मंदी येऊ घातली आहे.
नऊ प्रमुख आस्थापनांचे बाजार भांडवल मूल्य घटले- शेअर बाजारातील १० प्रमुख आस्थापनांपैकी ९ आस्थापनांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये गत सप्ताहाच्या अखेरीस घट झाली आहे. या आस्थापनांचे भांडवल मूल्य ८४,३५४ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या एकमेव आस्थापनेच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली आहे.- शेअर बाजारातील मंदीमुळे बाजाराच्या दहा प्रमुख आस्थापनांपैकी नऊ आस्थापनांचे बाजार भांडवल मूल्य कमी झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मूल्यामध्ये ७२,१५३.०८ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.- बाजार भांडवल मूल्यातील घसरणीचा सर्वाधिक फटका टीसीएस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅँक यांना बसला. या आस्थापनांचे बाजार भांडवल मूल्य अनुक्रमे ३०,८०७.१० कोटी, १९,४९५.४० कोटी आणि १५,०६५.८० कोटी रुपयांनी कमी झाले.