Join us

सामान्यांना हादरे! भाववाढीने बिघडले बांधकामाचे बजेट; सिमेंट, लोखंडाच्या दरात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:27 AM

विशेष म्हणजे लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद असतानाही हे दर वाढत आहेत. सिमेंट उत्पादक कंपन्याची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप वितरक करीत आहेत.  

प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ आता  सिमेंटचे दरही गोणींमागे ४१० रुपये झाले आहेत. लोखंडाचा दर ६२ रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या दरवाढीमुळे बांधकाम करणाऱ्यांचे बजेट  कोलमडू शकते. 

विशेष म्हणजे लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद असतानाही हे दर वाढत आहेत. सिमेंट उत्पादक कंपन्याची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप वितरक करीत आहेत.  परिणामी मागील जानेवारी महिन्यापासून सिमेंटचे भाव हळूहळू वाढवत सध्या ४१० रुपये गोणींपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये सिमेंटच्या दराने ४०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. फेबुवारी महिन्यापासून सळईचे भावही वाढण्यास सुरुवात झाली. मागील अडीच महिन्यांत १५ ते १७ रुपयांची वाढ झाली. कच्च्या मालच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट व लोखंडाचे भाव वाढल्याचे कंपन्याचे अधिकारी सांगत आहेत. 

४० हजारांनी वाढला बांधकाम खर्च१ हजार चौरस फूट बांधकामाला  सुमारे ५०० गोणी सिमेंट लागते. जानेवारीत सिमेंटचा दर ३३० रुपये गोणी होता.  तेव्हा  ५०० गोणीला १ लाख ६५ हजार रुपये खर्च येत असे. आता ४१० रुपये दर झाल्याने हा खर्च २ लाख ५ हजार रुपयांपर्यंत येत आहे. ४० हजार रुपयाने सिमेंटचा खर्च वाढला. सिमेंट महागल्याने सिमेंट पाइप, दरवाजे, खिडक्या, ढापे सर्वांचा खर्च वाढला.

जीएसटी १० टक्क्यांनी कमी करण्याची मागणीसिमेंटवर २८ टक्क्यांनी जीएसटी आकारला जातो. मात्र, तो १८ टक्क्यांपर्यंत खाली आणावा, अशी मागणी मागील चार वर्षांपासून क्रेडाईच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकारने अजूनही या मागणीला गांभीर्याने घेतले नाही. यामुळे परवडणाऱ्या घराच्या प्रकल्पावर याचा परिणाम होऊ शकतो.