Shankh Air Airline: देशातील आणखी एक विमान कंपनी आता उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. शंख एअर असं या विमान कंपनीचं नाव आहे. खरं तर शंख एअरला देशात काम करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. तर ऑपरेशन्ससाठी दिलेली एनओसी तीन वर्षांसाठी वैध असेल. मंत्रालयाच्या मंजुरी पत्रानुसार, कंपनीला एफडीआय इत्यादी नियमांच्या संबंधित तरतुदींचे तसेच यासंदर्भात लागू असलेल्या इतर नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, विमान कंपनीला अधिकृतरित्या उड्डाण सुरू करण्यापूर्वी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगी घ्यावी लागणार आहे.
उत्तर प्रदेशची पहिली विमानसेवा
शंख एअरबद्दल बोलायचं झालं तर ही उत्तर प्रदेशातील पहिली विमानसेवा असेल. याची केंद्र लखनौ आणि नोएडा येथे आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, उच्च मागणी आणि मर्यादित थेट उड्डाण पर्याय असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचं एअरलाइन्सचे उद्दीष्ट आहे. या माध्यमातून इतर राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढविण्याचं एअरलाइन्सचं उद्दिष्ट आहे.
इंडिगोचं आहे वर्चस्व
इंडिगोचा सध्या भारताच्या विमान वाहतूक बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक वाटा असून, ती देशातील सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. या विमानसेवेचा सातत्यानं विस्तार होत आहे. याशिवाय देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाही झपाट्यानं मोठी होत आहे. टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या संयुक्त मालकीच्या विस्ताराचं पुढील वर्षापर्यंत विलीनीकरण करण्याची कंपनीची योजना आहे. तसंच, एअर इंडिया एअर एशिया इंडियाचं अधिग्रहण करत आहे आणि याला एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन करणार आहे, ज्यामुळे त्यांचा ताफा आणि बाजारपेठेतील उपस्थिती वाढेल.
छोट्या कंपन्यांसमोर समस्या
सध्या छोट्या विमान कंपन्यांसमोर अनेक समस्या आहेत. उदाहरणार्थ, गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेडनं गेल्या वर्षी मे महिन्यात विमानसेवा बंद केली होती. त्याचबरोबर स्पाइसजेटला वाढत्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. स्पाइसजेटचा बाजारपेठेतील वाटा लक्षणीय रित्या घसरत असून जानेवारी २०२३ मधील ५.६ टक्क्यांवरून तो केवळ २.३ टक्क्यांवर आला. २०२१ मध्ये एअरलाइन्सचा मार्केट शेअर १०.५% होता.