मुंबई: टाटा सन्सबरोबरचे आपले संबंध संपविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शापूरजी, पालनजी ग्रुपची कंपनी स्टर्लिंग अॅण्ड विल्सन सोलरच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मंगळवारी टाटा सन्सने सर्वाेच्च न्यायालयात आपण मिस्री कुटुंबाकडे असलेले टाटा सन्सनचे सर्व शेअर्स बाजारभावाने खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर शाहपूरजी, पालनजी कंपनीने ७० वर्षांपासूनचे टाटा ग्रुपबरोबर असलेले आपले संबंध संपविण्याची घोषणा केली होती.
बुधवारी सकाळी शापूरजी, पालनजी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये असल्याचे दिसून आले. स्टर्लिंग अॅण्ड विल्सनच्या शेअर्समध्ये १२ वाजेच्या सुमारास मागील बंद दरापेक्षा १९.७४ टक्के वाढ झालेली दिसून आली. त्याचबरोबर फोर्ब्ज अॅण्ड कंपनी या दुसऱ्या एका कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ होऊन ते ५ टक्के वाढीव पातळीवर पोहचले.
शापूरजी पालनजी ग्रुप हा सध्या चलन टंचाईमध्ये सापडला असून, टाटा सन्समधील त्यांचे समभाग विकल्या गेल्यास त्यांना काही प्रमाणात पैसा उपलब्ध होईल. त्यामुळे आगामी काळात या ग्रुपच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळेच या ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स वाढून लागले आहेत.