Join us  

TJSB सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद गांगल, उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 29, 2022 7:26 PM

बँकेच्या संचालकांच्या बैठकीत नियुक्तीची घोषणा

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वीस हजार कोटींची उलाढाल असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार २७ सप्टेंबर रोजी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत सदर नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्ष विवेकानंद पत्की यांच्याकडून शरद गांगल यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

टीजेएसबी बँकेचे ज्येष्ठ संचालक असलेले शरद गांगल उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून टीजेएसबी बँकेत सतरा वर्ष कार्यरत आहेत. वाणिज्य कायद्याचे पदवीधारक असलेले शरद गांगल मानव संसाधन आणि व्यवस्थापन क्षेत्र याचे जाणकार आहेत. शरद गांगल यांनी भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योग समूहात विविध उच्चपदांवर दीर्घकाळ काम केले आहे. ठाण्याचे रहिवासी असलेले शरद गांगल औद्योगिक, व्यवसायिक संस्था, भारतीय आणि विदेशी विद्यापीठ येथे तज्ज्ञ व्याख्याते म्हणून जातात. बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक असलेले शरद गांगल सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य बँक प्रकोष्ठ प्रमुख आहेत. विविध सामाजिक कार्यात असलेले शरद गांगल विद्यार्थी विकास योजना या शैक्षणिक उपक्रमाचे संस्थापक सदस्य आहेत.

उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले वैभव सिंघवी हे सनदी लेखापाल आहेत. गेली पंचवीस वर्ष ते एक प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसाय करत आहेत. कर प्रणाली, लेखापरिक्षण यातील जाणकार असलेले वैभव सिंघवी संचालक म्हणून कार्यरत आहेत. पंधरा वर्ष वैभव सिंघवी यांनी अध्यापन केले. वाणिज्य शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैभव सिंघवी यांची पुस्तक विविध विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत. हरियाली या निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेत वैभव सिंघवी सक्रिय आहेत.

टॅग्स :बँकव्यवसाय