शरद पवार राजकारणातील दिलीप कुमार!
By admin | Published: August 16, 2015 11:44 PM
एकमेकांवर स्तुतिसुमने : पंकजा नव्या पिढीच्या दीपिका पदुकोनलातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे एकमेकांवर फिल्मी स्टाईलने स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. पंकजा यांनी पवार यांचा उल्लेख राजकारणातील दिलीप कुमार, असा केला; तर पंकजा या आजच्या पिढीच्या दीपिका पदुकोन असल्याचे पवार म्हणाले.येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख व शरद पवार यांच्यातील जुगलबंदीला उजाळा मिळाला. सुरुवातीला पंकजा यांनी पवार हे राजकारणातील दिलीप कुमार असल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी मी चित्रपट पाहत नाही. मला त्याची आवडही नाही, पंकजाने माझा उल्लेख दिलीप कुमार असा का केला हे मला कळले नाही. त्यामुळे मीसुद्धा त्यांना एका नायिकेची उपमा द्यायची ठरविले. त्यासाठी स्टेजवर असतानाच रितेशला आघाडीची नायिका कोण हे विचारले? त्याने माधुरी दीक्षितचे नाव सांगितले. पण मी आताच्या पिढीची नायिका कोण? असे पुन्हा विचारले. त्याने दीपिका पदुकोन हे नाव सांगितले. त्यामुळे पंकजाचा उल्लेख मी आजच्या पिढीच्या दीपिका पदुकोन असा करतो, असे सांगत कोपरखळी मारली.पवार म्हणाले की, विलासराव हे संकटांना धैर्याने सामोरे जाणारे नेतृत्व होते. लातूर भूकंपाच्या वेळी मी त्यांचे काम पाहिले आहे. ते सर्वसामान्यांचे हित जपायचे. ते आदर्श मंत्री होते. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आदर्श घालून दिला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि त्यांचे संबंध भावाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीची आठवण करून दिली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याने राज्याचे विशेषत: मराठवाड्याचे खूप नुकसान झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)----------शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीत जसे मानाचे स्थान आहे, तसेच पवार हे महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. - पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री ---------------------पंकजांनी मला दिलीप कुमार म्हटले. त्या नव्या पिढीच्या दीपिका पदुकोन आहेत.- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस-----------पवार-पंकजात संवाद नाही!संपूर्ण अडीच तासांच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारी बसले होते. परंतु त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. ते एकमेकांना टाळत असल्याचे सहजपणे लक्षात येण्यासारखे होते. -----------(फोटोओळी- फोटो-16विलासराव फोटो)लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे खा. शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर, आ. दिलीप देशमुख, आ. अमित देशमुख, पंकजा मुंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.