प्रसाद गो. जोशी
विविध आस्थापनांचे निराशाजनक निकाल आणि आर्थिक क्षेत्रातील घसरती आकडेवारी समोर आल्यानंतरही परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सलग चौथ्या सप्ताहामध्ये वाढीव पातळीवर बंद झाला. संवेदनशील निर्देशांकाने तर ५ महिन्यांमधील उच्चांकी पातळी गाठली आहे. बॅँकांच्या समभागांमधील तेजीने बाजाराला वाढीची संधी प्राप्त करून दिली.
सप्ताहातील पाच दिवसांच्या व्यवहारांपैकी बुधवारचा अपवाद वगळता संवेदनशील निर्देशांक सातत्याने वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहामध्ये त्यात १४३.५० अंश म्हणजे ०.४७ टक्क्यांनी वाढ होऊन तो २८४६८.७५ अंशांवर बंद झाला. गेल्या पाच महिन्यांमधील बंद निर्देशांकामधील हा उच्चांक आहे.
अधिक व्यापक पायावर असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (निफ्टी)नेही सप्ताहामध्ये वाढ नोंदविली आहे. हा निर्देशांक २८.१५ अंशांनी वाढून ८८२१.७० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमधील वाढ कायम आहे. बॅँकेक्समध्येही चांगली वाढ झालेली दिसून आली.
सप्ताहामध्ये जाहीर झालेले विविध आस्थापनांचे तिमाही निकाल हे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये झालेली घट आणि चलनवाढीमध्ये झालेली वाढ या निराशाजनक बाबी राहिल्या. भारतीय स्टेट बॅँकेच्या सहयोगी बॅँकांच्या विलीनीकरणाला मिळालेली मान्यता आणि एचडीएफसी बॅँकेच्या समभागांच्या खरेदीसाठी परकीय वित्तसंस्थांना मिळालेली मान्यता यामुळे बॅँकांच्या समभागांची भरपूर खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा रिझर्व्ह बॅँकेने परकीय वित्तसंस्थांना एचडीएफसी बॅँकेच्या समभाग खरेदीसाठी मनाई केली आहे.
दरम्यान, करांच्या वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीमध्ये अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत २३.९ टक्के तर प्रत्यक्ष करांच्या वसुलीमध्ये १०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परकीय वित्तसंस्थांनी ओतले ९५०० कोटी
अर्थसंकल्पामध्ये करविषयक तरतुदी स्पष्ट झाल्यानंतर चालू महिन्याच्या सुमारे १५ दिवसांमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये ९५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याआधीच्या जानेवारी महिन्यात या संस्थांनी विक्री केली होती.
१ ते १७ फेब्रुवारीदरम्यान परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३००२ कोटी रुपये समभागांमध्ये तर ६५५९ कोटी रुपये रोखे व तत्सम प्रकारांमध्ये गुंतविले आहेत. ही रक्कम ९५६१ कोटी रुपये (१.४२ अब्ज डॉलर) एवढी होते.
अॉक्टोबर ते जानेवारी या तिमाहीमध्ये या संस्थांनी भारतीय बाजारातून ८० हजार ३१० कोटी रुपये काढून घेतले होते. तत्पूर्वी सप्टेंबर २०१६मध्ये या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. नोटाबंदीचा कमी होत असलेला परिणाम आणि मागणीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे या संस्था पुन्हा भारताकडे वळल्याचे दिसते.
शेअर समालोचन - खरेदीच्या पाठिंब्याने चौथ्या सप्ताहातही तेजी
विविध आस्थापनांचे निराशाजनक निकाल आणि आर्थिक क्षेत्रातील घसरती आकडेवारी समोर आल्यानंतरही परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या जोरदार
By admin | Published: February 20, 2017 12:53 AM2017-02-20T00:53:35+5:302017-02-20T00:53:35+5:30