प्रसाद गो. जोशी
चीनबरोबर सीमेवर वाढलेला तणाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अमेरिका आणि चीनदरम्यानच्या व्यापारामध्ये असलेला ताण अशा निराशाजनक वातावरणामध्येही आगामी काळात अर्थचक्र गती घेण्याची असलेली अपेक्षा लक्षात घेऊन परकीय वित्तसंस्थांची वाढलेली गुंतवणूक यामुळे मुंबई शेअर बाजारात सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये वाढ झाली. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ओलांडलेली ३५ हजार अंशांची पातळी ही गुंतवणूकदारांचे मनोबल वाढविणारी आहे.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणामध्ये अस्थिर असलेला दिसून आला. निर्देशांक ३५७०६.५५ ते ३४४९९.७८ अंशांदरम्यान हेलकावे घेत होता. जून महिन्याच्या डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्टच्या अखेरच्या दिवशी बाजाराने उसळी घेतली. नंतर मात्र नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक काहीसा कमी झाला.
आंतरराष्टÑीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था ४.८ टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा वर्तविलेला अंदाज बाजाराची काळजी वाढविणारा आहे. मूडीजने मात्र आकुंचनाचा दर ३.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. सेबीने नोंदणीकृत कंपन्यांना आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता त्या ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करू शकतील.
परकीय वित्तसंस्थांची खरेदी सुरूच
गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये ५२६.२८ कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्था विक्री करताना दिसून आल्या. या संस्थांनी १३०९.५२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. चालू महिन्यातील त्यांची विक्री ५६३.०४ कोटी रुपयांची राहिली आहे.