मुंबई : सोमवारी जोरदार आपटी खाल्लेल्या शेअर बाजाराने मंगळवारी काहीशी तेजी दाखविली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले अनुकूल वातावरण आणि वाहन आणि वित्तीय कंपन्यांची झालेली जोरदार खरेदी यामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झालेले दिसले.
घसरणीचा अंबानी, अदानींना मोठा फटका
सोमवारी शेअर बाजारामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या उद्योगपतींना मोठा फटका बसला असून, त्यांचे ५१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या उद्योगपतींच्या विविध कंपन्यांचे समभाग सोमवारच्या घसरणीमुळे खाली आले. त्यामुळे या दोघांची संपत्ती ५१ हजार कोटी रुपयांनी घटली आहे. अदानी यांचे ४.२ अब्ज डॉलरचे (सुमारे ३.१७ अब्ज रुपये) तर मुकेश अंबानी यांचे २.७ अब्ज डॉलरचे (सुमारे २.०३ अब्ज रुपये) असे नुकसान झाले आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये दिवसभरामध्ये
६६०.६८ अंश म्हणजे १.३८ टक्क्यांनी वाढ होऊन तो ४८,५४४.०६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांका(निफ्टी)मध्येही १.३६ टक्के म्हणजे १९४ अंशांची वाढ होऊन तो १४,५०४.८० अंशांवर बंद झाला. मिडकॅप (२८७.२४ अंश) आणि स्मॉलकॅप (२४८.४७ अंश) हे वाढीव पातळीवर बंद झाले आहेत.
अन्य देशांच्या लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याच्या सरकारच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधान निर्माण झाले असून, त्यांनी बाजारात खरेदी केली. टीसीएसचे निकाल जाहीर झाल्यानंतर या कंपनीची मागणी वाढली असली तरी, माहिती तंत्रज्ञानाचे समभाग मात्र फारसे चमकले नाही. वित्तीय आणि वाहन कंपन्यांना चांगली मागणी असल्याने त्यांचे दर तेजीत दिसून आले. त्याचा लाभ निर्देशांकाच्या वाढीमध्ये बघावयास मिळाला.