Bigbloc Construction Shares : एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रिट (AAC) ब्लॉक्स बनवणाऱ्या बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6% ने वाढून रु. 253.40 वर बंद झाले. आजच्या सत्राच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्सने 261.40 रुपयांचा उच्चांकही गाठला. दरम्यान, आता बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनीही बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवार(19 जुलै) रोजी बैठक होत आहे. या बैठकीत बोनस शेअर्स देण्याबाबत विचार केला जाईल. जर कंपनीच्या बोर्डाने बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली, तर कंपनीने दिलेला हा पहिला बोनस शेअर असेल.
विशेष म्हणजे, या शेअरने गेल्या 4 वर्षात 4000% परतावा दिला आहे. 10 जुलै 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 6.09 रुपयांवर होते, तर आज, 5 जुलै 2024 रोजी रु. 253.40 वर बंद झाले. तर, या शेरअमध्ये गेल्या 3 वर्षांत 1100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 284 रुपये आहे, तर निच्चांक 137.55 रुपये आहे.
दरम्यान, शंकर शर्मा यांच्याकडे कंपनीचे 3.65 लाख शेअर्स आहेत. त्यांनी हे शेअर्स सरासरी 235 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले आहेत. शंकर शर्मा यांची या कंपनीत एकूण 8.57 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. कंपनीबद्दल सांगायचे तर, बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचे मुख्यालय सुरत येथे असून, कंपनीची सुरुवात 2015 मध्ये झाली होती.
(टीप-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)