Join us

एकीकडे कोरोनाचे आकडे वाढू लागले, दुसरीकडे भीतीने बाजार कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 4:53 AM

गुंतवणूकदारांची ३.५३ लाख कोटी रुपयांची संपत्ती बुडाली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरामध्ये कोविडचे वाढत असलेले रुग्ण, काही राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेअर बाजारामध्ये भीती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम बाजाराच्या मोठ्या घसरणीमध्ये झाला. यामुळे गुंतवणूकदारांची ३.५३ लाख कोटी रुपयांची संपत्ती बुडाली आहे. 

मुंबई शेअर बाजारात सोमवारची सकाळ उजाडली तीच मोठ्या घसरणीने. सकाळी शेअर बाजार सुमारे १४०० अंशांनी खाली गेला होता. एक काळ तर हा निर्देशांक १४६३ अंशांनी खाली गेला होता. मात्र जगभरातील शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरणाने नंतर त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली. दिवसअखेर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ८८२.६१ अंशांनी खाली येऊन ४७,९४९.४२ अंशांवर बंद झाला आहे. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांका(निफ्टी)मध्येही घट झाली. मात्र जसजसा दिवस चढत गेला तशी त्यामध्ये काहीशी सुधारणा झालेली बघावयास मिळाली. दिवसअखेरीस हा निर्देशांक  २५८.४० अंश म्हणजे १.७७ टक्क्यांनी खाली येऊन १४,३५९.४५ अंशांवर बंद झाला. बाजारात सर्वत्र विक्री करणाऱ्यांचेच राज्य असल्याचे चित्र बघावयास मिळाले. 

देशामधील कोरोनाची रुग्णसंख्या वाढती असून त्यावर अंकुश मिळविण्यासाठी काही राज्यांनी अंशत: लॉकडाऊनचा अवलंब केला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी विक्रीचा मार्ग अनुसरल्याने बाजार खाली आला. औषधनिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांमधील समभागांमध्ये घट झालेली आढळून आली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशेअर बाजार