Join us

हाहाकार! शेअर बाजार १५०० अंकांनी कोसळला; LIC चे समभागही धडाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 10:44 AM

जागतिक स्तरावरील दबाव आणि अन्य कारणांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेंसेक्स आणि एसएसई निफ्टी प्रत्येकी 2.59 टक्क्यांनी कोसळले.

गेल्या काही महिन्यांपासून विक्रीच्या गर्तेत अडकलेल्या शेअर बाजाराने आज सकाळीच धडपडायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात कोसळण्याची परंपरा आजही कायम राहिली. सेन्सेक्स जवळपास १५०० अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी 441 अंकांनी कोसळला आहे. एलआयसीच्या शेअरमध्येही तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. 

जागतिक स्तरावरील दबाव आणि अन्य कारणांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेंसेक्स आणि एसएसई निफ्टी प्रत्येकी 2.59 टक्क्यांनी कोसळले. बाजार सुरु होण्यापूर्वीच प्री-ओपन सेशनमध्ये शेअर बाजार घसरला होता. सेशन सुरु होण्याआधीच बाजार १००० अंकांनी कोसळला होता. तिकडे सिंगापूरमध्ये एसजीएक्स निफ्टीमध्ये देखील जबरदस्त घसरण झाली होती. 

सकाळी ९ वाजता जेव्हा बाजार उघडला तेव्हा तो १२०० अंकांनी घसरलेला होता. यानंतर २० मिनिटांतच शेअर बाजार 53 हजार अंकापेक्षा खाली आला आणि सध्या तो १५१६ अंकांनी घसरला आहे. निफ्टीदेखील 419.65 अंकांनी घसरला असून 15,782.15 वर ट्रेड करत आहे. शुक्रवारी देखील बाजारात मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स 1,016.84 अंकांनी (1.84 टक्के) आणि निफ्टी 276.30 अंकांनी घसरला होता. 

LIC च्या शेअरची हालत बेकार झाली आहे. कंपनीने आयपीओतून शेअर खरेदी करणाऱ्यांचे आधीच 1.66 लाख कोटी रुपये डुबविले आहेत. आजच्या बाजारातील पडझडीमुळे एलआयसीचा शेअर आणखी 3.15 टक्क्यांनी तुटला आहे. आता हा शेअर ७०० रुपयांहूनही खाली आला आहे. 

अमेरिका मुख्य कारण...

अमेरिकेतील महागाई वाढून जवळपास 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे वाढत्या व्याजदरामुळे आर्थिक विकासाचा वेग मंदावत आहे. या कारणांमुळे अमेरिकेत लवकरच मंदी येण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजारअमेरिका