प्रसाद गो. जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बाजारात गतसप्ताह हा अतिशय अस्थिरतेचा राहिला. परकीय वित्त संस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण मोठी विक्री, संमिश्र आलेले विविध कंपन्यांचे तिमाही निकाल, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण यामुळे बाजार सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये घसरून बंद झाला. विशेष म्हणजे या सप्ताहामध्ये बाजाराचे सर्वच निर्देशांक हे खाली आले आहे.
या घसरणीचा थेट फटका गुंतवणूकदारांचे बाजार भांडवलमूल्य घटण्यामध्ये झाला आहे. सप्ताहामध्ये भांडवल मूल्यामध्ये ५,१९,१७८.०२ कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमित झाले आहेत. बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी रिलायन्स, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या मूल्यामध्ये घट झाली आहे.
गुरुवारी होणार मुहूर्ताचे व्यवहारलक्ष्मी पूजनादिवशी शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे सौदे केले जातात. त्यासाठी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने एक तासाचे विशेष सत्र ठेवले आहे. बाजारामध्ये गुरुवारी संध्याकाळी ४.४५ पासून लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या एक तासाच्या विशेष सत्रामध्ये मुहूर्ताचे सौदे केले जातील. लक्ष्मी पूजनादिवशी प्रतिकात्मक सौदे केल्याने पुढील वर्षभर चांगला लाभ होतो, अशी पारंपरिक समजूत असल्यामुळे सुमारे ५० वर्षांपासून बाजारात लक्ष्मी पूजनादिवशी विशेष सत्राचे आयोजन केले जाते.
ऑक्टोबर महिन्यामध्ये परकीय वित्त संस्थांकडून सातत्याने विक्री केली जात आहे. यापैकी ६१.४० टक्के विक्री ही गतसप्ताहामध्ये झाली. गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी १५,७०२.२६ कोटी रुपयांची विक्री केली, तर संपूर्ण महिन्यामध्ये त्यांनी २५,७७२.१९ कोटी रुपयांची विक्री केली आहे. बाजार काहीसा खाली आल्याचा फायदा घेत देशांतर्गत वित्तसंस्था या सातत्याने खरेदी करीत आहेत. गतसप्ताहात त्यांनी ९४२७.२३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.
आगामी सप्ताहात कमी दिवस व्यवहार होतील. त्यामध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध आकडेवारी जाहीर होईल. तसेच फेडरल, रिझर्व्ह व बँक ऑफ इंग्लंडच्या बैठकांकडेही बाजाराचे लक्ष असेल.