Join us

Share Market: निवडणूक निकालांमुळे बाजाराला उत्साह; सलग तिसऱ्या दिवशी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 7:23 AM

बाजार बंद होताना निर्देशांक ८१७ अंकांच्या वाढीसह ५५,४६४.३९ वर बंद झाला. तर निफ्टीही २४९.५५ अंकांनी वाढून १६,५९४ वर बंद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणूक निकाल अपेक्षित लागल्याने शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी आपला वारू उधळला. युक्रेन युद्धसंकटातही रुपया मजबूत झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात १५०० अंकांनी वधारला. बाजार बंद होताना निर्देशांक ८१७ अंकांच्या वाढीसह ५५,४६४.३९ वर बंद झाला. तर निफ्टीही २४९.५५ अंकांनी वाढून १६,५९४ वर बंद झाला. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागांमध्ये सर्वाधिक ५.१७ टक्के वाढ दिसून आली. टाटा स्टील, एसबीआय, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, मारुती सुझुकी यांच्या समभागातही मोठी वाढ पाहायला मिळाली. तर केवळ टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब आणि यांच्या समभागांत घसरण झाली.

चर्चा आशादायी त्यामुळेही...रशिया-युक्रेनमधील उच्चस्तरीय चर्चा आशादायी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात वाढ झाली. त्याचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होत बाजाराने जोरदार मुसंडी मारली. बुधवारी परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ५,८१८.७१ कोटी रुपये काढले आहेत.

कच्चे तेल ११६ डॉलररशियाकडून तेल आणि इंधन आयात न करण्याची घोषणा अमेरिकेने करताच रशियाने स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात बाजारात तेल उतरवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे तेलाचे दर १७ डॉलर प्रति बॅरल इतके कमी झाले होते. मात्र गुरुवारी त्यामध्ये ४.१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

सोने-चांदी उतरलेआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मौल्यवान धातूंच्या दरामध्ये झालेली घट, शेअर बाजार तसेच रुपयामध्ये झालेली वाढ यामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घट झालेली दिसून आली. दिल्ली येथील सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये १० ग्रॅमला ९९२ रुपयांची घट होऊन ५२,६३५ रुपयांवर बंद झाले आहेत. चांदीचे दर किलोला ६९,४५८ रुपयांवर बंद झाले. मागील दरापेक्षा त्यामध्ये किलोमागे १९४९ रुपयांनी घट झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार