मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने शेअर बाजारामध्ये मोठी विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजारामध्ये सोमवारी प्रचंड घसरण झाली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये मोठी घसरण झाली. परिणामी गुंतवणूकदारांच्या ८.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, त्यामुळे सर्वत्र घबराट झाली आहे.
मुंबई शेअर बाजार सोमवारी खुला झाला तोच मुळी ६३४ अंशांच्या घसरणीने. त्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव सातत्याने राहिला. एक काळ तर बाजार १८०० अंशांनी खाली गेला होता. मात्र त्यानंतर त्यामध्ये थोडीशी सुधारणा होऊन तो ४७,८८३.३८ अंशांवर बंद झाला. दिवसभरामध्ये या निर्देशांकात १७०७.९४ अंश म्हणजे ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. २६ फेब्रुवारीनंतर बाजारात एका दिवसामध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण होय.
राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही मोठी विक्री झाल्याने येथील निर्देशांक (निफ्टी) ५२४.०५ अंश म्हणजेच ३.३५ टक्क्यांनी खाली येऊन १४,३१०.८० अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाने १४,३५० अंशांच्याखाली धाव घेतल्याने गुंतवणूकदार धास्तावलेले दिसून येत आहेत. स्मॉलकॅप आणि मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ११०५.४२ आणि १०३९.८४ अंशांची घट नोंदविली गेली आहे.
शेअर बाजारातील घसरणीमुळे बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य ८,७७,४३५.५ कोटी रुपयांनी कमी होऊन २,००,८५,८०६.३७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. हा तोटा केवळ कागदोपत्री असतो.
अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणामाची भीती
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यासारखे वाटत असल्याने महाराष्ट्रासह काही राज्यांनी लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन झाल्यास उत्पादनाची प्रक्रिया थांबण्याबरोबरच रोजगारही थांबणार असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यत आहे. मुख्यत: लॉकडाऊनच्या भीतीमुळे शेअर बाजारात विक्री वाढून त्याचा परिणाम निर्देशांक कोसळण्यामध्ये झाल्याचे सांगण्यात येते.