इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनं (IRCTC) या वर्षी आतापर्यंत ३०० टक्क्यांनी उसळी घेतली आहे. यानंतर १ ट्रिलियन रुपयांच्या मार्केट कॅपच्या एलिट क्लबमध्ये सामील होणारी सार्वजनिक क्षेत्रातील नववी कंपनी बनली आहे. IRCTC केवळ रेल्वेने प्रवास करण्यासाठीच नव्हे तर मोठी कमाई करुन देणारी कंपनी म्हणूनही ओळखली जात आहे. IRCTC चे शेअर्स मंगळवारी सकाळच्या 6375.15 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. परंतु बाजार बंद होताना मात्र IRCTC चे शेअर्स जोरदार आपटले. एका वृत्तामुळे याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरल्याचं म्हटलं जात आहे. बाजार बंद होताना IRCTC चे शेअर्स 4996.05 रूपयांवर बंद झाले.
CNBC आवाजनं दिलेल्या वृत्तानुसार रेल्वेमध्ये रेग्युलेटरची तयारी करण्यात येत आहे. RITES ने रेग्युलेटरची नियुक्ती करण्याचा रिपोर्ट दिला आहे. RITES च्या रिपोर्टनंतर आता कॅबिनेट नोट तयार केली जाईल. खासगी ट्रेन्ससाठी रेग्युलेटरची शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पॅसेंजर ट्रेन्सही रेग्युलेटरच्या कक्षेत येणार आहे. याशिवाय मालभाडेही रेग्युलेटरच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरपासून तेजीIRCTC च्या शेअर्समध्ये सप्टेंबर महिन्यापासून तेजी पाहायला मिळाली होती. १ सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमच २७३० रूपये होती. परंतु यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत हा शेअर ४ हजार रूपयांच्या जवळ पोहोचला. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही शेअर्समध्ये तेजीचं सत्र सुरू होतं. दीर्घ कालावधीसाठी हा शेअर २ हजार रूपयांच्या टप्प्यात होता. परंतु कंपनीनं शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केल्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली.
२८ ऑक्टोबर रोजी IRCTC च्या शेअर्स स्पिटची प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या या शेअरची फेस व्हॅल्यू १० रूपये इतकी आहे. परंतु शेअर्स स्प्लिटनंतर या शेअरची फेस व्हॅल्यू २ रूपये होणार आहे. याशिवाय याचा ISIN क्रमांकदेखील बदलला जाणार आहे.