>> डॉ. पुष्कर कुलकर्णी
मागील भागात आपण स्टॉप लॉस, शॉर्ट सेल आणि ट्रेड पोझिशन म्हणजे काय ते जाणून घेतले. या भागात गुंतवणूकदारांचे प्रकार जाणून घेऊया. विस्तृतपणे गुंतवणूकदार एकूण चार प्रकारात मोडतात.
१. विदेशी गुंतवणूकदारः शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीची संधी असते. फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII), नॉन रेसिडेंट इंडियन्स (NRIs) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PIO) यांना विदेशी गुंतवणूकदार म्हणून संबोधलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँक विदेशी गुंतवणूकदारांवर नियंत्रण ठेवते. विदेशी गुंतवणूकदार थेट आपल्या एक्सचेन्जमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर भारतीय कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त २२% भांडवली हिस्सा गुंतवू शकतात. हेच प्रमाण नॉन रेसिडेंट इंडियन आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन यांच्यासाठी १०% आहे. बाजारातील चढ उतार या गुंतवणूकदारांमुळे अधिक प्रमाणात होत असतो.
विदेशी गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत लाखो कोटी रुपयांमध्ये आहे. जर बाजारातील हिस्सा मोठ्या प्रमाणात या गुंतवणूकदारांनी काढून घेतला तर बाजार खाली पडतो. तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर बाजार मोठ्या प्रमाणात वर जातो. यांची गुंतवणूक ही थेट भारतीय कंपन्यांमध्ये असते आणि तसेच इंडेक्स फंडमध्ये असते. कंपन्यांच्या तिमाही आणि वार्षिक कामगिरीवरून या कंपन्यांमधील विदेशी गुंतवणूक कमी-अधिक होत राहते. तसेच जागतिक शेअर बाजारांचा कल कोणत्या दिशेने आहे, यावरही विदेशी गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेत असतात.
२. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सः भारतीय संस्था ज्या थेट भांडवली बाजारात विविध कंपन्यांमध्ये थेट आणि इंडेक्स फंड्समध्ये पैसे गुंतवतात अशा संस्थांना डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणतात. म्युचुअल फंड हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्समधील उत्तम उदाहरण होय. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमाणी, रामदेव अग्रवाल ही नावे आपल्या कानावर कधी ना कधी आलीच असतील. यांच्या स्वतंत्र संस्था आहेत, ज्या भारतीय भांडवली बाजारात थेट गुंतवणूक करीत असतात. कंपन्यांच्या कामगिरीनुसार डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स त्यातील हिस्सा कमी-अधिक करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर कंपनीची विक्री, उलाढाल आणि नफा वाढतो आहे असे तिच्या तिमाही किंवा वार्षिक निकालानंतर दिसून आले, तर त्या कंपनीचा शेअरचा भाव खरेदी वाढल्याने वृद्धिंगत होत राहतो. या उलट कामगिरी खराब दिसून आली तर शेअरची विक्री होऊन भाव उतरतो. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्समार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी अथवा विक्री झाली, तर त्यानुसार त्या शेअरचा भाव वाढतो किंवा कमी होतो. भारतीय आयुर्विमा ही संस्था एक मोठी डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहे.
शेअर बाजारात 'ट्रेडिंग' करायचं असेल Stop Loss माहीत हवाच; 'शॉर्ट सेल'ही ठरू शकतो 'गेम चेंजर'
शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!
शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या!
३. म्युच्युअल फंड्स : सर्वसामान्य गुंतवणूकदारास थेट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला भीती वाटते किंवा शेअर बाजाराची सखोल माहिती नसल्याने थेट गुंतवणूक करण्यास काचकूच करतो. अशा वेळेस म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून ते पैसे शेअर बाजारात गुंतविले जातात. म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत. यात इक्विटी फंड आणि बॅलन्स फंड हे दोन प्रमुख आहेत. इक्विटी फंडमध्ये लार्ज कॅप / ब्लु चिप / मिडकॅप / स्मॉल कॅप असे उपप्रकार आहेत, तर बॅलन्स फंडमध्ये इक्विटी आणि कर्जरोखे यात विशिष्ट प्रमाणात रक्कम गुंतविली जाते. सर्वसामान्य गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम गुंतवू शकतो. म्युचुल फंड नेमका कोणता निवडावा यासाठी एक्सपर्ट गुंतवणूक सल्लागार योग्य सल्ला देऊ शकतात. रक्कम गुंतवताना म्युच्युअल फंड्सचा एन. ए. व्ही दर ( नेट असेट व्हॅल्यू रेट ) नुसार युनिट्स मिळतात. उदाः एखाद्या म्युच्युअल फंड्सचा एन. ए. व्ही. ५०/- रुपये आहे आणि आपण १,०००/- रुपयांचे म्युच्युअल फंड्स घेण्याचे ठरविले तर आपल्याला त्या म्युच्युअल फंड्सचे २० युनिट्स ( रुपये १००० भागिले ५०) मिळतात.
एस आय पी माध्यमातून प्रत्येक महिन्यात आपण विशिष्ट रक्कम गुंतवू शकतो आणि ज्या दिवशी म्युच्युअल फंड्स खरेदी केले जातात त्या दिवशीचा एन. ए. व्ही दर आकारला जातो आणि त्यानुसार युनिट्स आपल्या खात्यात जमा होतात. एन. ए. व्ही. चा दर बाजारातील इंडेक्स मधील उतार आणि चढाव यावर निश्चित होत असतो. म्युच्युअल फंडस् कंपनीचे एक्सपर्ट्स रोजच्या रोज मार्केटचा अभ्यास करून गुंतवणूकदारांची रक्कम योग्य शेअर्स मध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या खात्यात जितके युनिट्स शिल्लक असतील तितके व्हॅल्युएशन आपल्या गुंतवणुकीचे ठरते. गुंतवणूकदार आपल्या सोयीने एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये आपली रक्कम हस्तांतरित करू शकतो किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा रक्कम काढूही शकतो. हे सर्व ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूकदारास स्वतः किंवा गुंतवणूक सल्लागार यांच्या माध्यमातून करता येते. विशिष्ट उद्देश उदा. मुलांचे शिक्षण, मुला/मुलीचं लग्न किंवा रिटायरमेंट फंड इत्यादी समोर ठेवून म्युच्युअल फंड्समध्ये केलेली गुंतवणूक ही एक योग्य गुंतवणूक ठरू शकते. म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून संस्थेने जर बाजारात मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविली किंवा मोठ्या प्रमाणात बाजारातून रक्कम काढून घेतली तर त्याचा प्रभाव त्या-त्या शेअर्सवर किंवा एकूण बाजाराच्या चढ - उतारावर दिसून येतो.
४. रिटेल इन्व्हेस्टर : पॅन कार्ड धारक ज्याचे डिमॅट अकाउंट आहे असा सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणजेच रिटेल इन्व्हेस्टर. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी शेअर ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट सुरू करून स्वतः अभ्यास करून शेअर बाजारात गुंतवणूक करणारा प्रत्येक जण रिटेल इन्व्हेस्टर म्हणून ओळखला जातो. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये भारतात एक कोटीच्या वर नव्याने डिमॅट अकाउंट उघडली गेली. जवळजवळ २० ते २२ टक्के नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात आले. रिटेल गुंतवणूकदार जरी मोठ्या संख्येने असले तरी त्यांचा बाजारातील भागभांडवलात एकूण हिस्सा कमी असल्याने त्यांच्या खरेदी आणि विक्रीमुळे बाजारातील चढ - उतारावर त्याचा परिणाम अगदी नगण्य असतो.
पुढील भागात आपण पाहूया बुल आणि बेअर.. (क्रमशः)