LIC Mutual Fund : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलै २०२४ मध्ये म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांनी २३ हजार ००० कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. यावरुन याचं महत्त्व अधोरेखित होते. मात्र, अनेकदा इच्छा असूनही कमी उत्पन्न असलेल्या लोकांना यात गुंतवणूक करता येत नाही. अशात छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. LIC म्युच्युअल फंड लहान रकमेची सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेन्ट प्लॅन (SIP) आणण्याची योजना आखत आहे. कंपनी दैनिक 100 रुपयांची एसआयपी योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. फंड हाऊससाठी सध्याची मर्यादा 300 रुपये आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ आरके झा यांनी ही माहिती दिली.
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) लहान SIP चे समर्थन करत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त गुंतवणूकदार यात येऊ शकतील. अलीकडेच सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच मायक्रो-एसआयपीबद्दल बोलल्या होत्या.
रोजंदारीवर काम करणारेही घेतील लाभमुंबईत मॅन्युफॅक्चरिंग फंडावर NFO लाँच करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना आरके झा म्हणाले की AMC रजिस्ट्रार केफिनटेक सर्व्हिसेससोबत काम करत आहे. LIC म्युच्युअल फंडाची सध्याची किमान SIP रकमेची मर्यादा दैनिक SIP साठी १०० रुपये आणि मासिक SIP साठी २०० रुपये करण्याची योजना आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा हा उद्देश यामागे असल्याचं आरके झा म्हणाले.
LIC म्युच्युअल फंड AUM वाढवेलझा पुढे म्हणाले की, फंड हाऊसने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३५,००० कोटी रुपयांवरून ६५,००० कोटी रुपये आणि २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या अखेरीस १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
SIP म्हणजे काय?एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटीक इनवेस्टमेन्ट प्लॅन. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एसआयपी. SIP अंतर्गत गुंतवणूकदार नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवतो. तुमच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम वजा केली जाते आणि SIP मध्ये गुंतवणूक केली जाते.